विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पोलीस नाईक, पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून बढतीस पात्र असलेल्या जिल्हा पोलीस दलातील १०० पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वरिष्ठ स्तरावरून संबंधित कर्मचा-यांची यादी तयार करण्यात आली आहे.पोलीस दलातील अधिकारी, कर्मचा-यांची तोकडी संख्या आणि इतर अतिरिक्त कामामुळे गुन्ह्यांच्या तपासावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. दाखल होणा-या गुन्ह्याचा तपासाधिका-याला चांगल्या पध्दतीने उलगडा करता यावा, यासाठी पोलीस दलाच्या वतीने नियमित सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाते. पोलीस दलाने यापुढेही एक पाऊल टाकत बढतीसाठी पात्र असलेल्या कर्मचा-यांनाही प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस महानिरीक्षकांच्या सूचनेनुसार पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक व पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून बढतीसाठी पात्र असलेल्या कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील १०० पोलीस कर्मचा-यांची यादी तयार करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयात निवासस्थानासह भोजनाची व्यवस्था केली जाणार असून, पहाटेपासून रात्रीपर्यंत गुन्ह्याचा तपास, तणावमुक्त कामकाज, आधुनिक शस्त्रास्त्रे, कायद्यातील बदल, न्यायालयाचे निर्णय, शरीर स्वास्थ्यासाठी योगा व यासह इतर बाबींवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.अधिका-यांना नियमित प्रशिक्षणजिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या अधिका-यांनाही नियमित प्रशिक्षण दिले जाते. यासाठी औरंगाबाद येथे अधिका-यांच्या तुकड्या पाठविल्या जात असून, कायद्यातील बदल, आधुनिक शस्त्रांसह इतर बाबींचे प्रशिक्षण अधिका-यांना दिले जात आहे.
शंभर पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार निवासी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:20 AM