काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतींना प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:42 AM2019-08-01T00:42:45+5:302019-08-01T00:43:55+5:30
जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी निरीक्षक म्हणून प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस टी.पी. मुंडे हे होते. आघाडीमध्ये काँग्रेसमध्ये जालना जिल्ह्यातील जालना आणि परतूर हे दोन मतदारसंघ काँग्रेससाठी सुटले आहेत. असे असताना काँग्रेसने पाचही विधानसभेतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
येथील हॉटेल अंबरमध्ये या मुलाखती पार पडल्या. प्रारंभी टी.पी.मुंडे यांचा सत्कार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केला. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी सभापती भीमराव डोंगरे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. जालना विधानसभा मतदारसंघातून माजी आ. कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आर. आर. खडके, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विमल आगलावे, सत्संग मुंडे यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करून मुलाखत दिली. घनसावंगी मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर पवार यांनी एकमेव मुलाखत दिली. भोकरदन मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचा एकमेव अर्ज आला असल्याचे टी.पी. मुंडे म्हणाले. बदनापूर या राखीव मतदारसंघातून दिनकर घेवंदे, अॅड. देविदास डोंगरे आणि रोहन लोखंडे यांनी मुलाखत दिली. परतूर मतदारसंघातून माजी आ. सुरेशकुमाार जेथलिया तसेच जिल्हा परिषद सदस्य राजेश राठोड यांनी अर्ज दाखल केला.
यावेळी इच्छुकांनी त्यांनी पक्षासह समााजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा सादर करून निवडून येण्यासाठीची माहिती दिली. यावेळी माजी आ. धोंडीराम राठोड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, राजेंद्र राख, बदर चाऊस, वसंत जाधव, राम सावंत, शेख सैय्यद, आनंद लोखंडे आदींची उपस्थिती होती. या मुलाखतींचा अहवाल वरिष्ठांना देण्यात येणार आहे.