मक्यावर अळीचा प्रादुर्भाव
जाफराबाद : यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची पेरणी केली आहे. गत आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे पिकेही तरारली आहेत. परंतु, मक्यावर सध्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अळीचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहेत.
शिष्यवृत्ती त्वरित वाटप करण्याची मागणी
जालना : भारत सरकार शिष्यवृत्ती त्वरित वाटप करा, शासकीय वसतिगृह त्वरित सुरू करा, त्याचबरोबर मागील वर्षीची आणि या वर्षीची वसतिगृह प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू करा, या विविध मागण्यांसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया जालना जिल्हा कमिटीच्या वतीने सामाजिक न्यायमंत्र्यांना सहायक आयुक्त यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
सूचना फलक गायब, चालकांची कसरत
बदनापूर : जालना- औरंगाबाद महामार्गावर असलेल्या बदनापूर शहराला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. ही बाब पाहता बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन खराब रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
शेंडगे विद्यालयात कोरोना योद्धयांचा गौरव
जालना : जालना शहरातील चंदनझिरा भागातील शिवाजीराव शेंडगे विद्यालयातील लसीकरण केंद्रावर कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविकांना या विद्यालयाने एक वृक्ष व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब आबूज, मार्था वाघमारे, गोकुळा खांडेकर, मंदा वाघमारे आदींची उपस्थिती होती.
मुबलक लसींच्या पुरवठ्याची मागणी
बदनापूर : शहरासह ग्रामीण भागातील केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. परंतु, अनेक केंद्रांवर अपुरी लस असल्याने तासनतास थांबून अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. ही बाब पाहता आरोग्य विभागाने शहरासह ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर मुबलक लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
खंडित वीजपुरवठा
सेलगाव : बदनापूर तालुक्यातील सेलगावसह परिसरातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे लघु व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. शिवाय शेतशिवारातील कामेही ठप्प होत आहेत. या भागातील तांत्रिक अडचणी सोडविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही समस्या उद्भवत आहे. तरी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रस्ता उखडला
पारध : येथील पारध - पिंपळगाव रेणुकाई हा मुख्य रस्ता पहिल्याच पावसात उखडला गेला आहे. दोन महिन्यांपूर्वीच उर्दू शाळा ते पारध या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. परंतु, ठिकठिकाणी रस्ता उखडल्याने ग्रामस्थांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन महिन्यातच रस्ता उखडला आहे. लक्ष देण्याची मागणी होत आहे.