जालना : आटोक्यात आलेली कोरोना संसर्गाची दुसरी लाट जालना जिल्ह्यात आता वेगाने उफाळून येत आहे. प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केल्यानंतरही नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. कोरोनाचा विळखा तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मास्क, सुरक्षित अंतरासह इतर निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी खोतकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात राज्याला कोरोना मुक्तीच्या दिशेने नेले. दुसऱ्या टप्प्यातील कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्य शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जालना शहर व जिल्हावासीयांनी अद्याप कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजारांवर गेली असून, दिवसागणिक शंभरपेक्षा जास्त रुग्णांची भर पडत आहे. काही ठिकाणी विवाह सोहळ्यांत सॅनिटायझर न वापरणे, गर्दी करून भौतिक अंतराचे उल्लंघन, मर्यादेपेक्षा जास्त गर्दी, आदी बाबी घडत आहेत. जालना शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू नये याची खबरदारी घेऊन प्रशासनाच्या वतीने वेळीच निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
...तर गुन्हे दाखल करावेत
आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने मार्च महिना अत्यंत महत्त्वाचा असून, टाळेबंदी ही सर्व घटकांच्या दृष्टीने परवडणारी नाही. त्यामुळे जिल्हा यंत्रणेने वेळीच कठोर पावले उचलावीत. प्रत्येक चौकात पथके तैनात करावीत. विना मास्क फिरणाऱ्यांना प्रथम वेळी दंड आकारला जातोय; परंतु दुसऱ्या वेळेस विना मास्क फिरताना आढळल्यास थेट गुन्हे दाखल करावेत, असेही खोतकर यांनी नमूद केले.