लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात शनिवारी जोरदार हजेरी लावली. यामुळे सकाळपासूनच उमेदवारांना घराबाहेर पडतांना अडचणी आल्या. तसेच दिवसभर रिमझिम तर कधी धुवाधार पाऊस पडल्याने प्रचाराचा शेवटचा दिवस असलेल्या शनिवारी पावसाने नेत्यांचा हिरमोड झाला.यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी केवळ १२ दिवसच मिळाले. या बारा दिवसांत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना उमेदवारांच्या नाकी नऊ आले. तत्पूर्वी निवडणुका आॅक्टोबर मध्ये निश्चित असल्याने अनेक प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आधी त्यांच्या मतदार संघात येणाऱ्या ग्रामीण भागातील गावांना भेटी देऊन ग्राऊंड तयार केले होते. शेवटच्या आठवडाभरात अनेक उमेदवारांनी त्यांचा शहरीभाग आणि आसपासच्या खेड्यांसाठी राखून ठेवला होता. शनिवारी प्रचार संपणार असल्याने अनेक नेत्यांनी विविध भागांत प्रचार फेºया तसेच कॉर्नर बैठकांचे आयोजन केले होते. परंतु पावसाने हे नियोजन कोलमडले.त्यामुळे सर्व पक्षाच्या नेत्यांनी ज्या भागात प्रचाराचे नियोजन होते, तेथील नागरिकांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्याचे दिसून आले. सकाळी अनेक रॅली तसेच पदयात्रा काढून प्रचारात रंगत भरण्याचा प्रयत्न झाला. रिमझिम पावसातही कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला. सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्यावर कायकर्ते आणि नेत्यांनी प्रचार कार्यालय, निवासस्थान गाठून पुढील दोन दिवसांच्या नियोजनाचा आढावा घेतला.जालना शहरात सकाळपासून रिमझिम पाऊस होता. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर, काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल व इतर उमेदवारांनी कॉर्नर बैठका घेऊन गाठीभेटी घेतल्या.परतूरमध्ये बबनराव लोणीकर, सुरेशकुमार जेथलिया व इतरांनी मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर दिला. घनसावंगीत राजेश टोपे, हिकमत उढाण यांनी प्रचारफेरी काढली.भोकरन आणि बदनापूरमध्येही महायुती, आघाडी व इतर उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला.
परतीच्या पावसाचा प्रचाराला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 12:51 AM