जालना : जातीचे प्रमाणपत्र पुढे पाठविण्यासाठी व फाईल पाठविल्याचा मोबदला म्हणून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना भोकरदन तहसील कार्यालयातील महसूल सहायकास तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी पकडले. श्रीकृष्ण अशोक बकाल (३२ रा. शिंगनेनगर, देऊळगाव राजा) असे संशयिताचे नाव आहे.
तक्रारदाराचे नातेवाईक असलेल्या चार व्यक्तींना भिल्ल तडवी जातीचे प्रमाणपत्र काढायचे होते. त्यांनी ऑनलाइन पूर्तता करून प्रमाणपत्र तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठवायचे होते. हे प्रमाणपत्र पाठविण्यासाठी भोकरदन तहसील कार्यालयातील महसूल सहायक श्रीकृष्ण बकाल याने प्रत्येकी ३०० रुपयांप्रमाणे एक हजार २०० रुपये व यापूर्वी पाठविलेल्या आठ फाईलींचा मोबदला म्हणून २ हजार ४०० रुपये असे एकूण तीन हजार ६०० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने याची तक्रार जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पथकाने सापळा रचून महसूल सहायक श्रीकृष्ण बकाल यांना तडजोडीअंती तीन हजार रुपयांची लाच स्वीकारतांना पंचासमक्ष पकडले. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे, पोलिस निरीक्षक एस. एस. शेख, पोलिस कर्मचारी गणेश चेके, गणेश बुजाडे, जावेद शेख, जमदाडे, चालक सुभाष नागरे आदींनी केली आहे.