या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे , कृषिविकास अधिकारी जि. प. रणदिवे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे देशमुख, जिल्हा अग्रणी बँकेचे ईलमकर आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री टोपे म्हणाले, खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बी-बियाणे तसेच खतांचे वाटप होईल या दृष्टीने कृषी विभागाने काटेकोरपणे नियोजन करण्याबरोबरच बियाणांचा व खतांचा काळाबाजार होणार नाही तसेच निकृष्ट दर्जाच्या बियाणांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या बियाण्यांची बाजारात विक्री न करता त्याच बियाणांचा पेरणीसाठी अधिक प्रमाणात वापर करण्याचे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर योजना असून, या योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. यासाठी जिल्ह्याला देण्यात आलेले पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण होण्यासाठी प्रत्येक बँकांना देण्यात आलेले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे. कर्जवाटपाच्या बाबतीत कुठलीही सबब ऐकून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांनी सातत्याने या वाटपाचा आढावा घेण्याचे निर्देशही पालकमंत्री दिले.
चौकट
ऑक्सिजन प्लांटला प्राधान्य
जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असून, बाधित व्यक्तींना चांगल्या प्रमाणात उपचार मिळावेत यासाठी आरोग्याच्या सेवा अधिक प्रमाणात वाढविण्यावर भर देण्यात येत असून, प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्ट सुरू करण्यात येत आहे. आमदार निधीतून एक् कोटी रुपये कोविडसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली असल्याने प्रत्येक लोकप्रतिनिधी यांनी या माध्यमातून आवश्यक ती साधन-सामुग्री खरेदी करावी, असेही टोपे यांनी नमूद केले.
2 Attachments