वालसावंगी : पारध ते वालसावंगी फाटा या अजिंठा-बुलडाणा महामार्गाला जोडणाऱ्या १३ किलोमीटर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे पाहता, हा प्रवासाचा मार्ग की मृत्यूचा सापळा, असाच प्रश्न वाहन चालकांसह प्रवाशांना पडत आहे.
भोकरदन तालुक्यातील पारध ते वालसावंगी फाटा हा रस्ता अंजिठा-बुलडाणा या महामार्गाला जाऊन मिळतो. या १३ किलोमीटर अंतराच्या मुख्य मार्गाची अतिवृष्टी आणि वाळू माफियांच्या अवजड वाहनांमुळे वर्षभरात वाट लागली आहे. वालसावंगी हे गाव भोकरदन तालुक्यातील सर्वांत मोठे बाजारपेठेचे गाव असून, परिसरातील वाढोणा, विझोरा, जाळीचा देव, धावडा, जनुनासह परिसरातील २५ गावांचा संपर्क या गावाशी असतो. परिसरातील शाळकरी, महाविद्यालयीन मुलेही शिक्षणासाठी येथे येतात. पारधपासून वालसावंगीकडे जाणाऱ्या तीन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे, परंतु वालसावंगी पर्यंत ७ किलोमीटर रस्त्यांचे काम अर्धवट आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यावरील खडी वाहून गेल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी बांधकाम विभाग व खासगी कंत्राटदाराकडून रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली होती, परंतु काम निकृष्ट झाल्याने रस्ता पुन्हा खड्डेमय बनत चालला आहे. या खड्ड्यातून वाहने चालविताना चालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. ही बाब पाहता, संबंधितांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहन चालकांसह प्रवासी करीत आहेत.
पारध ते वालसावंगी फाटा या १३ किलोमीटर मुख्य रस्त्यावरील काही काम अर्धवट राहिले आहे, शिवाय काही ठिकाणी खडी उखडल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यानंतर खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. बांधकाम विभागाने तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी.
- संदीप लोखंडे, शिवसेना उपशहरप्रमुख, वालसावंगी
फोटो