लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : टेंभुर्णी येथील एका सराफा व्यापाऱ्याच्या घरी बुधवारी रात्री जबरी चोरीची घटना घडली. तीन चोरांनी चाकूचा धाक दाखवून २ लाख २९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केल्याची ही घटना संतोषी मातानगर येथे घडली. पंधरा दिवसांच्या आतच परिसरात दुसऱ्यांदा मोठी चोरी झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या दोन्ही चो-यांचा तपास त्वरित लावावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.बुधवारी रात्री चोरट्यांनी येथील सोन्याचे व्यापारी राजू दत्तात्रय डहाळे (३०) यांच्या स्वयंपाक घराचा कडी - कोंडा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी घरात झोपलेल्या राजू डहाळे व त्यांच्या पत्नीला सुरा व चाकूचा धाक दाखवून पती- पत्नीच्या अंगावरील व घरातील जवळपास २ लाख २९ हजारांचे दागिने व रोख १४ हजार रुपये घेऊन पोबारा केला. दरम्यान यावेळी घरातील आरडाओरडा ऐकून डहाळे यांची छोटी मुले रडू लागली तेव्हा त्यांचा आवाज बंद कर अशी हिंदी भाषेत धमकी चोरट्यांनी डहाळे यांच्या पत्नीला दिली. सुदैवाने चोरट्यांनी डहाळे यांच्या परिवाराला मारहाण केली नाही.चोरटे पळून जाताच घाबरलेल्या अवस्थेत डहाळे यांनी पोलिसांना फोन लावला. त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी अवघ्या १० मिनिटात घटनास्थळी भेट दिली. परंतु तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. या घटनेपूर्वी चोरट्यांनी डहाळे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या मुख्याध्यापक गोविंद जाधव यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न केला. परंतु बाहेरगावी गेलेल्या जाधव कुटुंबियाच्या घरात चोरट्यांना काहीच न सापडल्याने त्यांनी आपला मोर्चा डहाळे यांच्या घराकडे वळविला. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तीन चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेचा तपास सपोनि. सुदाम भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार पंडित गवळी करीत आहेत.दरम्यान, केवळ पंधरा दिवसांच्या अंतराने मोठ्या चो-यांच्या या दोन्ही घटनांनी घबराटीचे वातावरण आहे.यावेळी चोरांनी राजू डहाळे यांच्या गळ्यातील चैन, हातातील अंगठ्या काढून घेतल्यानंतर त्यांना झोपण्यास सांगितले. नंतर त्यांनी डहाळे यांच्या पत्नीला घरात कुठे काय आहे, ते लवकर काढून दे म्हणून दम दिला. यावेळी त्यांच्या पत्नीने एका डब्यात ठेवलेले पंधराशे रुपये काढून देताना ते मुलीला दवाखान्यात नेण्यासाठीचे असल्याचे सांगितल्यावर चोरट्यांनी ते परत केले.ठसेतज्ज्ञ व श्वानपथक पाचरणया चोरीचा तपास करण्यासाठी टेंभुर्णी पोलिसांनी जालना येथून ठसेतज्ज्ञ अणि श्वानपथकाला जलद पाचारण केले. मात्र चोरटे बहुतेक मोटारसायकल वर बसून पसार झाल्याने श्वानाने केवळ ईबीके विद्यालयापर्यंच माग काढल्याचे बीट जमादार गवळी यांनी सांगितले.दोनदा चोरीराजू डहाळे यांच्या दुकानात व घरी दीड वर्षापूर्वी दोनदा चोरी झालेली आहे. त्या चो-यांचा तपास अद्याप गुलदस्त्यात असताना पुन्हा बुधवारी अशी जबरी चोरी झाल्याने डहाळे परिवार प्रचंड दहशतीखाली वावरत आहे.
चाकूचा धाक दाखवून सराफाला लुटले; टेंभुर्णीत लुटारूंची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:57 AM