लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्याच्या महिला संघटनचे कार्य अत्यंत कौतुकस्पद आहे. असे असले तरी समाजाच्या उन्नतीसाठी महिलांबरोबरच पुरुष प्रधान संस्कृतीने आणि युवा संघटनने देखील आपली ताकद स्त्री शक्तीच्या पाठीशी भक्कमपणे उभी करुन सम्यक विचार, दूरदृष्टी आणि सुदृढता या त्रिसूत्रीनुसार मार्गक्रमण केल्यास कोणतीही शक्ती आपल्याला रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन माहेश्वरी समाजाच्या कार्यकर्त्या सुशीला काबरा यांनी येथे बोलताना केले.महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनच्या सातव्या सत्रातील तृतीय कार्यकारिणीची बैठक आणि अष्टम सत्र पदग्रहण समारोहास शुक्रवारी प्रारंभ झाला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी निवडणूक अधिकारी लता लाहोटी, माहेश्वरी समाजाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकिशन भन्साळी, उपाध्यक्ष संजय दाड, युवा संघटनचे प्रदेशाध्यक्ष शरद काबरा, पुष्पा तोष्णीवाल, शैला कलंत्री, अनुसया मालू, महिला संघटनच्या जिल्हाध्यक्षा निर्मला साबू, जिल्हा सचिव मीनाक्षी दाड, महिला प्रदेश उपाध्यक्षा मंगल भंडारी, माजी अध्यक्षा निर्मला करवा, महिला प्रदेश सहसचिव सूर्यमाला मालाणी आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना काबरा म्हणाल्या, स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी आपल्या अंगी आत्मविश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रहिताच्या उज्वल भविष्यासाठी नारीशक्तीचं मोठं योगदान राहिलेलं असून यापुढेही ही शक्ती कमी होणार नाही. त्यामुळे हे राष्ट्र निश्चितच प्रगतीच्या दिशेने चालेल, असे सांगून त्या म्हणाल्या की, महिला संघटनमध्ये काम करत असताना आता पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. नारी शक्तीच्या पाठीशी प्रत्येकाची शक्ती एकवटत आहे. त्यामुळे समाज देखील प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र समाजाची उन्नती- प्रगती साधायची असेल तर आपल्याला सम्यक विचार ठेवावे लागतील, असेही त्या म्हणाल्या.त्यानंतर इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी जालना जिल्हा माहेश्वरी महिला संघटनच्या जिल्हाध्यक्ष निर्मला साबू, सचिव मीनाक्षी दाड, कोषाध्यक्षा सरोज करवा, संघटनमंत्री राजश्री दरक, उपाध्यक्षा नूतन दाड, शिल्पा मालपाणी, कृष्णा मंत्री, पद्मा तापडिया, सहसचिव कविता लखोटिया, श्रध्दा जेथलिया, शारदा बाहेती, अनिता राठी, संघटनमंत्री संगीता लाहोटी यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी सर्व समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.माहेश्वरी समाजासह दीन- दुबळ्यांसाठी सातत्याने कार्यमग्न राहणा-या चंद्रकला भक्कड आणि मीराबाई मुंदडा यांना माहेश्वरी महिला संघटनच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्प गुच्छ देऊन त्यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.
सम्यक विचार, दूरदृष्टी आणि सुदृढता या त्रिसूत्रीनुसार मार्गक्रमण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 1:04 AM