जालना : शहरातील एका २१ वर्षीय युवकाने चोरी झाल्याचा बनाव करुन १ लाख रुपये हडप केल्याची घटना आज उघडकीस आली. करण किसन खैरे (२१. रा. मस्तगड जालना) असे आरोपीचे नाव असून चंदनझिरा पोलिसांनी २४ तासात या गुन्ह्याचा तपास लावला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करणने शुक्रवारी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, मी एका स्क्रॅप कंपनीमध्ये मागील ६ महिन्यापासून आॅफिस बॉय म्हणून काम करतो. शुक्रवारी सायंकाळी मला कंपनीचे मालक अनुप अग्रवाल यांनी मित्राकडून १ लाख रुपये घेवून ते राजेश काळे यांना देण्याचे सांगितले. सांयकाळी आठ वाजेच्या सुमारास मी एमआयडीसी भागातून पैसे घेवून जात असतांना एका हॉटेल जवळ तीन जणांनी माझी गाडी अडवून मला बेदम मारहाण केली व माझ्याकडून १ लाख रुपये काढुन घेतले.
त्यानंतर पोलीसांनी संशयितांची चौकशी केली मात्र काही सुगावा लागला नाही. पोलिसांनी करणची विचारपूस केली असता तो गोंधळात पडला. त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली देऊन १ लाख रुपये पोलीसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे, पोनि. राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. बाळासाहेब पवार, पोउपनि. प्रमोद बोंडले, कर्मचारी अनिल काळे, अजय फोके, मच्छींद्र निकाळजे यांनी केली.