लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात मंजूर कामांसाठी जिल्ह्यास ३८ कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे मंजूर कामे अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे.जलयुक्त शिवार अभियानाच्या तिस-या टप्प्यात जिल्ह्यातील १४९ गावांची निवड झाली आहे. या गावांमध्ये नाला खोलीकरण, रुंदीकरण, बांध-बंधिस्ती, सिमेंट नाला बांध, सलग समतल चर खोदणे, तलावांमधील गाळ काढणे आदी दोन हजार ५४६ कामे मंजूर आहेत. पैकी एक हजारांवर कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेल्या कामांची देयके देण्यासह उर्वरीत कामांना अधिकाधिक गती मिळावी यासाठी मृदा व जलसंधारण विभागाकडून औरंगाबाद विभागासाठी २३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पैकी ३८ कोटी ३२ लाख रुपये जालना जिल्ह्यातील कामांसाठी मिळणार आहे. निवड झालेल्या गावांमधील प्रतिनिधीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेणे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची कामे करणे, तसेच पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांसाठी निधीची तरतूद करणे आदी कामांसाठी हा निधी खर्च करण्याचे निर्देश आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर अधिकाधिक कामे जूनअखेर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हा समितीचे सचिव दशरथ तांभाळे यांनी दिली.
जलयुक्तसाठी ३८ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:10 AM