लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गुढी पाडव्यानिमित्त गुढी उभारण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत, या वर्षी ग्रामीण भागात भगव्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या गुड्या उभारण्यात आल्या. मोडून साऱ्या जुन्या जळमट रुढी, उभारली आम्ही शिवछत्रपतींची गुढी, असा संदेशही यानिमित्त समाजमाध्यमातून देण्यात आला.चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. घराघरात गुढी उभारून पारंपरिक पद्धतीने हर्षोल्हासात साजरा केला जातो. यानिमित्त रविवारी घरोघरी उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. महिलांनी घरासमोर सडा-रांगोळी काढून गुढी उभारण्याची तयार केली. ग्रामीण भागात यंदा गुढी उभारण्याच्या पारंपरिक पद्धतीत बदल झाल्याचे चित्र अनेक गावांमध्ये पहावयास मिळाले. वेळुला साडी, साखर गाठी बांधून त्यावर उलटा तांब्या लावण्याऐवजी ग्रामीण भागात भगवा पतका लावून गुढ्या उभारण्यात आल्या. तांब्या उलटा लावण्याऐवजी गुढीजवळ पाटावर तांब्याचा कलश ठेवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या भगव्या झेंड्यांच्या गुढ्याही अनेक ठिकाणी उभारण्यात आल्या. काही ठिकाणी गुढीजवळ छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमाही ठेवण्यात आल्याचे पहावयास मिळाले. जालना तालुक्यातील माळशेंद्रा, जामवाडी, घाणेवाडी, निधोना, मांडवा, दगडवाडी आदी गावांमध्ये हेच चित्र दिसून आले. भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांमध्ये भगव्या पताकांच्या गुढ्या उभारण्यात आल्या. जुन्या रुढी पंरपरा झुगारून देत सामाजिक बदलाची ही नांदी स्वागतार्ह असल्याच्या भावना यानिमित्त अनेकांनी व्यक्त केल्या.
ग्रामीण भागात भगव्या पताकांच्या गुढ्यांनी वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:46 AM