लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील जेनपूर कठोरा येथील कोल्हापुरी बंधा-यात लोकसहभागातून पाणी अडविण्यात आले आहे. त्यानंतर आता तांदुळवाडी येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधा-याचे काम हाती घेतले आहे. लोकसहभागातून नदीपात्रात मुरूम, मातीचा भराव टाकण्यात येत आहे.तालुक्यात परतीच्या पावसामुळे पूर्णा, गिरीजा, केळना, रायघोळ या नद्यांवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या बाजूचा भराव वाहून गेला. तालुक्यातील शेतक-यांनी तीन वर्षे कोरड्या दुष्काळाचे चटके सहन केले आहेत. शिवाय या वर्षी परतीच्या पावसाने शेतकºयांच्या तोंडातील घास हिरावून नेला आहे. त्यामुळे आता किमान रबी हंगाम तरी चांगला होईल असे शेतक-यांना वाटत असतानाच आॅक्टोबर महिन्यात नद्यांना आलेल्या महापुरात बंधारे वाहून गेले. त्यामुळे नदीकाठी शेतजमीन असलेल्या शेतक-यांचे रबी पीक कसे येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र जेनपूर कठोरा येथील शेतक-यांनी शासकीय कामावर अवलंबून न राहता ४ लाख ५० हजार रुपये वर्गणी जमा करून बंधा-यात पूर्ण क्षमतेने पाणी अडविले आहे.याबाबत ‘लोकमत’ ने १९ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत २० नोव्हेंबर रोजी तांदूळवाडी येथील ज्ञानेश्वर सावंत, बाबूराव आहेर, शेषराव सावंत, भगवान चिकटे, दत्तू चिकटे, ज्ञानेश्वर सावंत, सुरेश ढवळे, सोमनाथ खरात, गणपत चिकटे, प्रल्हाद खरात या शेतक-यांनी पुढाकार घेऊन सर्व शेतक-यांना एकत्र केले. बंधा-यामुळे ज्या शेतक-यांना सिंचनासाठी लाभ होतो आशा शेतक-यांकडून वर्गणी जमा करून तांदूळवाडी येथील कोल्हापुरी बंधा-याची दुरूस्ती करण्याचे काम सुरू केले आहे. सध्या पोकलेन, जेसीबी, टिप्पर लावून ७५ टक्के काम करण्यात आले असून, दोन दिवसांत भराव टाकण्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे या बंधाºयातही ७७० सघमी पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे २२० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. दरम्यान, शेतक-यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे राज्याचे जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी कौतुक केले आहे.
तांदूळवाडी ग्रामस्थांनी स्वखर्चातून केले बंधाऱ्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:50 AM