वडीगोद्री (जालना) : ''मी सामाजिक नेतृत्व करतो, राजकीय नाही'', अशी भूमिका जाहीर करत मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी एका जातीवर निवडणुक लढवता येणार नाही, सर्वांना सोबत घेऊन हे समीकरण जुळवणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला. तसेच आजच्या बैठकीत प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार फायनल करू, अशी माहितीही जरांगे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आज दिली.
विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी अंतरवाली सराटी येथे आज मुलाखतीसाठी मोठी गर्दी केली आहे. राज्यभरातून हजारोच्या संख्येने इच्छुक उमेदवार दाखल झाले असून मुलाखतीला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी याबाबत माहिती देताना जरांगे म्हणाले, राज्यातील इच्छुक उमेदवार बोलावले आहेत, एससी, एसटीच्या जागेवर मराठा समाजाची ताकत देणार असल्याचे जरांगे म्हणाले. एक उमेदवार दिल्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक जण उभ राहायचं म्हणत आहे, म्हणून मी सर्वांना बोलून घेतल. सर्वांनी काम केलेलं आहे, प्रत्येकाचं चळवळीसाठी योगदान आहे. सर्वांशी बोलून एकच उमेदवार फायनल करून मात्र, तो आज जाहीर करणार नाही. त्यानंतरही ज्यांनी ऐकले नाही त्यांच्यावर मी नाराज होणार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
२९ ते ३० तारखेला उमेदवार जाहीर करूसर्वांनी ३० दिवस कष्ट घेतले तर पुढचे ५ वर्ष सर्वजनता, ओबीसी अठरापगड जातीचे लोक आनंदात राहतील. सर्वांना हात जोडून विनंती करतोय प्रत्येक मतदासंघांत चार पाच जणांनी फॉर्म भरून ठेवायचे आहेत. मात्र, शेवटी एकच जण फायनल होईल. २५ ते २७ ऑक्टोबर या काळात मी राजकीय समिकरण जुळवेल. एकच उमेदवार दिला तर समाजाचे इतर लोक अर्ज मागे घेतील. एकच उमेदवार राहिला तर गोर गरीबांना न्याय मिळेल. किती मतदारसंघ लढायचे हे आज जाहीर करणार नाही. येत्या २९ ते ३० ऑक्टोबरला मतदारसंघ आणि उमेदवार जाहीर करु, असे जरांगे यांनी जाहीर केले.