लोकमत न्यूज नेटवर्कजालना : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेला जालन्यातील बाजारपेठेतील मरगळ दूर झाल्याचे चित्र होते. सोने, वाहन तसेच टीव्ही, वॉशिंग मशीन, संगणक खरेदीसाठी बाजारात बुधवारी मोठी गर्दी दिसून आली.अक्षयतृतीयेनिमित्त सोने खरेदी करण्याचा परंपरा आहे. बुधवारी सोन्याचा भाव प्रतितोळा ३१ हजार ६०० रूपये होता. अशी माहिती सराफा व्यापारी भरत जैन यांनी दिली. सोन्याचा भाव गेल्या दोन दिवसात वाढल्याने ग्राहकांनी बुधवारी मुहूर्त साधण्यासाठी काही ग्रॅममध्येच सोने खरेदी करणे पसंत केल्याचे जैन म्हणाले. त्यामुळे सोने खरेदीसाठी सराफा बाजारपेठेत गर्दी दिसत असली तरी अपेक्षित अशी उलाढाल झाली नसल्याचे दिसून आले. अक्षयतृतीये निमित्त वाहन बाजारात मात्र बऱ्यापैकी तेजी असल्याचे चित्र दिसून आले. अनेकांनी आजच्या महुर्तावर चारचाकी आणि दुचाकी खरेदीसाठी वाहनांच्या शोरूममध्ये सकाळपासूनच गर्दी दिसून आली. इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेतही एलईडी, वॉशिंंग मशीनसह, फ्रीज खरेदीला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. एकूणच अक्षयतृतीयेने बाजारात गेल्या काही महिन्यांपासून आलेली मरगळ हटल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
खरेदीसाठी जालन्यातील बाजारात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:56 AM