जालना : चौथ्या वेळीही मुलगीच झाल्याने नराधम पित्याने एक महिन्याच्या चिमुकलीला विहिरीत फेकून खून केल्याचे समोर आले आहे. चंदनझिरा पोलिसांनी गुरुवारी पित्यासह मातेलाही ताब्यात घेतले. ही घटना १२ एप्रिल रोजी दुपारी आसरखेडा गावच्या शिवारात समोर आली होती.
सतीश पंडित पवार, पूजा सतीश पवार (रा. वखारी वडगाव तांडा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. आसरखेडा गावाच्या शिवारातील एका विहिरीत १२ एप्रिल रोजी एक महिन्याच्या बालिकेचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदनानंतर त्या मुलीला जिवंतच विहिरीत फेकल्याचे समोर आले होते. पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान आसरखेडा गारवाडी तांडा (बावणे पांगरी) येथील एका महिलेची प्रसूती झाली. परंतु, तिच्याकडे बाळ नसल्याची माहिती समोर आली. सतीश पवार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मुलीच्या खुनाची कबुली दिली.
असा केला उलगडा
या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी गत तीन महिन्यांपूर्वी जिल्हाभरात जन्मलेल्या मुली आणि त्या घरी आहेत का याची तपासणी मोहीम हाती घेतली होती. आशा वर्करमार्फत ५०० हून अधिक मुलींची तपासणीही केली होती. ही तपासणी सुरू असताना या घटनेचा उलगडा झाला.