-शिवचरण वावळे
जालना: येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात मराठा बांधवांची हळूहळू गर्दी वाढत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आल्यानंतर त्यांना 50 फूट क्रेन द्वारे हार घालून त्यांचे स्वागत केले जाणार आहे. शिवाय त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी या ठिकाणी दहा जेसीबी देखील तयार ठेवण्यात आले आहेत.
केवळ मराठी बांधवच नव्हे तर विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, महिला भगिनींनी देखील या ठिकाणी हातात भगवा, निळा ध्वज घेऊन गर्दी केल्याचे दिसून येत आहे. या शांतता रॅलीत सहभागी होणाऱ्या लहान आबाल, ज्येष्ठांनी कपाळावर आणि हाताच्या मनगटावर लाल अक्षरांमध्ये "मराठा" असे गोंदले (टॅटू) अन् डोक्यावर भगवी टोपी घालून प्रत्येकजण रॅलीत सहभागी होत असल्याचे दिसत आहे.
जरांगे पाटील शहरातील संभाजी चौकमध्ये आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून सकाळी दहा वाजता रॅलीची सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, आत्ताची परिस्थिती बघता रॅली च्या वेळेत अंशतः बदल होणार असून ही रॅली शहरातील मोतीबागेजवळील छत्रपती संभाजी महाराज चौकातून सुरुवात होणार असून पुढे, शनी मंदिर, गांधी चमन, मस्तगड, मम्मादेवी मंदिर, नेताजी सुभासचंद्र बोस चौक, गरीब शाह बाजार, पाणी वेसमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात या रॅलीचे रूपांतर सभेत होणार आहे.