लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगाम अद्याप लांब असला तरी कृषी विभागाकडून त्याची जय्यत तयारी आतपाासूनच केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी कृषी विभागाने कलश सीडस्मध्ये कृषी विक्रेत्यांची कार्यशाळा घेतली. त्यात बीटी बियाणांच्या पाकिटांची विक्री ही ५ जून नंतरच करण्याचे निर्देश सर्व विक्रेत्यांना देण्यात आले आहेत. हे निर्देश देण्या मागे बोंड अळीने पुन्हा हल्ला केल्यास त्यावर नियंत्रण मिळवतांना उपाययोजना करणे सोपे होऊ शकते असे सांगण्यात आले.जालना जिल्ह्यात जवळपास सहा लाख हेक्टरवर खरिपाच्या परेणीचे नियोजन आहे. त्यासाठी ११ लाख बीटी बियाणांची पाकिटे लागणार असून, ही पाकिटे कृषी विक्रेत्यांना त्यांच्या दुकानात साठवून ठेवता येतील, मात्र, त्यांची विक्री ही पाच जून नंतरच करावी असे सांगण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी कपाशीला बोंड अळीपासून रोखण्या संदर्भातील सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, अनेक शेतकरी हे जालना जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात साधारणपणे ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे, ते कपाशीची लागवड करतात. त्यामुळे बोंडअळीच्या पतंगांना सहज हल्ला करणे शक्य होते. परंतु नंतर तिचे उच्चाटन करताना नाकी नऊ येतात. हे रोखण्यासाठी एकाच वेळी लागवड करणे हितकारक ठरणार असल्याचे मिटकरी म्हणाले.यावेळी बियाणांप्रमाणेच खतांचे नियोजनही महत्त्वाचे असल्याचे सांगून, यावेळी खतांचा तुटवडा जाणवणार नसल्याचे सांगितले. परंतु रेल्वे स्थानकावरून खताची वाहतूक करतांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यायसाठी विशेष उपाय योजना करण्याची गरज यावेळी व्यक्त केली गेली. यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही त्याची कल्पना देण्यात आली. बोगस बियाणांची विक्री रोखण्यासाठी नऊ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी औरंगाबाद येथून आलेले संशोधन सहायक संचालक बी.डी. पवार यांनी मार्गदर्शन केले.शेतक-यांना मदतकरणे गरजेचेदुष्काळाने होरपळलेल्या शेतक-यांना येत्या हंगामात कुठलीच अडचण येऊ नये म्हणून, कृषी विभाग तसेच व्यापा-यांनी देखील सहकार्य करण्याची गरज आहे. कुठल्याही बियाणे, खतांची विक्री झाल्यास लगेचच शेतक-यांना त्याचे पक्के बिल देण्यास सहकार्य करावे, जेणेकरून एखाद्यावेळी उगवण क्षमता कमी असणे अशा तक्रारी येणार नाहीत. बोगस बियाणांची विक्री होत असल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येऊन संबंधितांचा विक्री परवाना निलंबित करण्याचे अधिकारही शासनाने राखून ठेवले आहेत.- विजय माईनकर,सहसंचालक कृषी विभाग, जालना
पाच जूननंतरच बीटी बियाणांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 1:23 AM