लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : मंठा तालुक्यातील भूवन येथील पूर्णा नदीपात्राच्या वाळू पट्ट्यातून नियमबाह्य वाळूचे उत्खनन सुरु आहे. विशेष म्हणजे या ठिकाणाहून वाळू उत्खनन करताना संबंधित कंत्राटदार शासनाच्या नियमांची पायमल्ली करीत आहेत. मात्र, महसूलचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे पाहावयास मिळत आहे.भुवन या वाळू पट्ट्याच्या लिलावानंतर संबंधित कंत्राटदाराला उत्खनन करण्यासाठी महसूलकडून ९ एप्रिल रोजी ताबा देण्यात आला होता. त्यानंतर गट क्र. ०१ मधून ३४० मीटर लांबी, ६५ मीटर रूंदी व १. ०० मीटर खोली इतक्या क्षेत्रातून ७ हजार ८०९ ब्रास वाळू उत्खननाची परवानगी दिलेली आहे. मात्र, कंत्राटदार विनोद नाथा दराडे (रा. झोटींगा, ता. सी. राजा, जि. बुलडाणा) यांनी शासनाने ठरवून दिलेल्या क्षेत्राबाहेरुन व क्षमतेपेक्षा जास्त वाळू उत्खनन सुरु केले आहे. वाळू पट्ट्यावर एक ब्रास रॉयल्टीवर दीड ब्रास वाळू वाहतूक, दोन ब्रास रॉयल्टीवर तीन ब्रास वाळू वाहतूक, तीन ब्रास रॉयल्टीवर चार ब्रास वाळू वाहतूक, चार ब्रास रॉयल्टीवर सहा ब्रास वाळू वाहतूक केली जात आहे.दिवसभरात सकाळी एकदाच रॉयल्टी घेतल्यानंतर पुन्हा दिवसभर रॉयल्टी न घेता वाळू वाहतूक करण्याचीच मुभा दिली जात आहे. सकाळी पहिल्या एका ब्रास वाळू रॉयल्टीसाठी ३ हजार ५०० रुपये वाहनधारकांना मोजावे लागतात. त्यानंतर त्याच रॉयल्टीवर फक्त २ हजार रुपये घेतले जातात. वाहनांची संख्या वाढल्यानंतर पोकलेनने वाळू उत्खनन करुन वाहने भरुन दिली जातात, असेही वाळू भरणा-या मजुरांनी सांगितले आहे.या वाळू पट्ट्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, तरीही अवैध उपसा सुरू आहे.
वाळू उत्खनन जोरात सुरू, प्रशासनाचे दुर्लक्ष...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 1:06 AM