परतूर : तालुक्यातील सतोना ( खु ) येथील अवैध वाळू उपस्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान घडली. यावेळी वाळू माफियांनी वाहनाची तोडफोड करून पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
परतूर तालुक्यातील कसुरा नदी पात्रातून अंगलगाव वाळू पट्यातून अवैध वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती महसूल कार्यालयास प्राप्त झाली. यावरून महसूल कार्यालयाचे एक पथक मंगळवारी (दि 17) रात्री १२ वाजेच्या दरम्यान कारवाईसाठी नदी पात्रावर गेले. पथक आल्याचे कळताच वाळू माफियांनी पथकावर हल्ला केला. कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यांची गाडी उलटवून टाकली. यात तलाठी अधिक यादव, पंडित काकडे, रवी रेड्डी, मुकुंद डोलहारकर, चालक अतिक हे जखमी झाले आहेत.