जालना : मंगळवारी मध्यरात्री महसूलच्या पथकावर हल्ला केल्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपी गणेश काकडे याने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
जालना शहराजवळील मोती तलाव परिसरात महसूल विभागातील दोन मंडळ अधिकारी आणि दोन तलाठ्यांचे एक पथक वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तैनात होते. याचवेळी अडीच वाजेच्या दरम्यान एका हायवातून वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे पथकाला दिसून आले. त्यांनी लगेचच या हायवाचा पाठलाग केला; परंतु हायवाच्या पाठीमागून येणाऱ्या एका जीपने महसूल पथकाच्या कारला जोरदार धडक देऊन शंरभ मीटरपर्यंत फरपटत नेले होते. या घटनेत पथकातील चारही जणांचा जीव बालंबाल बचावला. मोती तलावाशेजारील कठड्यावर यांची कार अडकल्याने या कर्मचाऱ्यांना जीवनदान मिळाले. या हल्ला प्रकरणात कदीम पोलिसांनी जालन्यातील ढवळेश्वर महादेव मंदिर परिसरात राहणारा संशयित आरोपी गणेश काकडे याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून वाळूची वाहतूक करण्यासाठी वापरलेला हायवा तसेच स्काॅर्पिओची चावी घरी असल्याचे काकडेने सांगितले. त्यावरून पोलीस हे त्याला घेऊन घरी गेले.
घरातून चावी आणतो म्हणून काकडे आत गेला आणि तेथून त्याने धूम ठाेकली. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या पळून गेलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी कदीम पोलिसांनी दोन पथकांची नियुक्ती केली असून, लवकरच त्याला अटक करू, असा दावा कदीम जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत महाजन यांनी केला.