देळेगव्हाण : वाळू घाटाचे लिलाव झालेले नाहीत, असे असतांना जाफराबाद तालुक्यासह देळेगव्हाण परिसरात वाळू तस्करी जोरात सुरू आहे. या अवैध धंद्याला महसूल व पोलीस विभागाची मूक संमती तर नाही ना? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाकडून कुठलीच ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे देळेगव्हाण परिसरात वाळू माफियांची मुजोरी वाढली आहे. वाढत्या वाळू चोरीमुळे शासनाचा महसूल बुडत आहे. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावते आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे वाळू तस्करीची अनेक प्रकरणे उघड केली होती. मात्र, कार्यवाही नावापुरतीच झाली. ठोस कार्यवाही न झाल्याने वाळू तस्करांचे मनोबल वाढल्याचे दिसते. वाळू तस्करांच्या सुसाट वाहनांने अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तरीही कार्यवाही होत नाही. आता तरी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.