वडीगोद्री (जालना) - विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पण, मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे महायुतीच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता दिसत आहे. मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर १७ सप्टेंबरपासून अन्न पाण्याचा त्याग करत बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी आज मनोज जरागे पाटील यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदेंच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीची चर्चा होत आहे.
रविवारी सकाळी 10: 30वाजता खासदार संदीपान भुमरे यांनी अंतरवाली सराटी येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली.
मनोज जरांगेंनी संदीपान भुमरेंना काय सांगितले?
संदीपान भुमरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, "मला वाटते 17 तारखेपर्यंत गॅजेट जर लागू केले, तर मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी मराठ्यांचा एक आनंदाचा दिवस उगवू शकतो. आपण हे काम तातडीने करावे हेच भुमरे साहेबांना सांगितले. समाजाशी दगा फटका करू नका. एक वर्षापासून गोरगरिबांचे आंदोलन सुरू आहे."
"चर्चा हीच झाली की मराठा समाजाचे एक वर्षापासून जे विषय आहेत, सगे सोयरेची अंमलबजावणी आणि 83 क्रमांकाला मराठा-कुणबी एकच आहेत. शंभूराजेंनी समिती पाठवली होती. तिच्या माध्यमातून 8 हजार पुरावे सापडले आहेत. सगेसोयरेच्या बाबतीत थोडं राहिलं आहे", अशी माहिती भुमरे यांनी बैठकीनंतर दिली.
जरांगे पाटील यांच्यासोबतच्या भेटीबद्दल बोलताना भुमरे म्हणाले, "मनोज जारांगे यांची भेट मी आज नाही, नेहमी घेत असतो. विशेष असे काही नाही. गॅझेटच्या बाबतीत समिती काम करत आहे. शंभूराज देसाई यांनी सांगितले की लवकरात लवकर निर्णय घेतोय."
"उद्या मुख्यमंत्री येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कानावर आम्ही टाकणार आहे, लवकर समाजाला कसा न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री सांगतील, मी सांगण्यापेक्षा. उद्या मुख्यमंत्री येणार आहे. मुख्यमंत्री आपल्याला सांगतील लवकरात लवकर निर्णय व्हावा असं मला वाटते. चर्चा नेहमीच होत असते", असेही भुमरे म्हणाले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत. याच दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घोंगडी बैठका घेत आहेत. दुसरीकडे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत, यामुळे सत्ताधारी महायुतीसमोर मोठा पेच असणार आहे.