संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामाच्या लगबगीने बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. अद्याप पेरणीयोग्य पाऊस पडला नसला तरी, बियाणे, खतांच्या खरेदीसाठी बळीराजा सरसावला आहे. गेल्या वर्षी कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीऐवजी शेतकरी सोयाबीनकडे वळल्याचे चित्र असून, सोयाबीनच्या बियाणांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. महाबीजने गुजरातहून चार हजार क्विंटल सोयाबिनचे बियाणे मागवले असून, कृषी विभागाने आणि अडीच हजार क्विंटल बियाणे लागणार असल्याचा प्रस्ताव एनएससीकडे पाठवला असल्याचे सूत्रांनी सांगितले.जालना जिल्ह्यात खरीप हंगामाचे क्षेत्र हे पाच लाख ८७ हजार हेक्टर एवढे आहे. त्यातील निम्मे क्षेत्र पूर्वी कपाशी लागवडी खाली येत असत, मात्र गेल्यावर्षी शेंदरी बोंडअळीने हैराण झालेल्या बळीराजाने कपाशीकडे पाठ फिरवल्याचे सध्या बाजारातील सोयाबीनच्या मागणीवरून दिसून येत आहे. महाबीजने यापूर्वीच बाजारात ११ हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून दिले होते. मात्र, त्यात पुन्हा वाढ होऊन आणखी चार हजार क्विंटल बियाणे हे गुजरात राज्यातून मागवले असल्याचे सांगण्यात आले.राष्ट्रीय सीड्स महामंडळाकडेही जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जवळपास अडीच हजार क्विंटल जास्तीचे बियाणांची मागणी केली आहे. या जास्तीच्या प्रस्तावाची पूर्तता केव्हा होते.याकडे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात मंगळवार पर्यंत ९८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे अद्याप बहुतांश ठिकाणी पेरण्यांना प्रारंभ झाला नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.जालना : बीटी बियाणांचा साठा पडूनदरवर्षीप्रमाणे यंदाही मागणी प्रमाणे बीटी बियाणांचा साठा जवळपास ८ लाख २७ हजार पाकीटे उपलब्ध झाला आहे. पैकी सोमवार पर्यंत तीन ते सव्वातीन लाख पाकिटांचीच विक्री झाल्याचे सांगण्यात आले. गेल्यावर्षीचा विचार केल्यास याच कालावधीत बीटी बियाणांच्या पाकिटांची विक्रीही पाच लाख पाकिटा पर्यंत पोहचली होती. यंदा तब्बल दोन लाख पाकिटांनी आज घडीला विक्री कमी झाल्याचे दिसून येत आहे. यातूनच शेतक-यांनी कपाशी ऐवजी सोयाबिनला प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
सोयाबीन बियाणांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:54 AM