लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भोकरदन तालुक्यातील पारध येथील उर्दू शाळेच्या वर्ग खोलांच्या बांधकामासाठी वारंवार लेखी मागणी करूनही काहीच उपाययोजना न केल्यामुळे शालेय समितीच्या सदस्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांच्या दालनासमोर विद्यार्थ्यांची शाळा भरवली. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला. शिक्षणाधिकाऱ्यांच्या वर्ग खोल्या उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर शालेय समितीने माघार घेतली.पारध येथे जिल्हा परिषदेअंतर्गत मराठी व उर्दू माध्यमाची शाळा आहे. उर्दू माध्यमाच्या वर्ग खोल्या मोडकळीस आल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे उर्दू माध्यमाच्या शाळा खोल्यांचे बांधकाम करण्यात यावे, अशी लेखी मागणी ग्रामस्थांसह शालेय समितीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे या पूर्वी केली होती. वारंवार मागणी करूनही शाळा खोल्यांच्या बांधकामाकडे प्रशासनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांना कुलूप लावून मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनासमोर शाळा भरविण्यात येईल, असा इशारा शालेय समितीने दिला होता. त्यानंतर शाळेला कुलूपही ठोकले होते. मात्र, शिक्षण विभागा कडून कुठल्याही उपाययोजना न झाल्यामुळे गुरुवारी शालेय समितीचे सदस्य विद्यार्थ्यांना घेऊन थेट जिल्हा परिषदेत पोहोचले.मोडक्या वर्ग खोल्यांचे चित्र असलेले फलक घेऊन विद्यार्थ्यांनी सीईओ नीमा अरोरा यांच्या दालनासमोरच शाळा भरवली. जोपर्यंत वर्ग खोल्यांबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत येथून न हटण्याचा पवित्रा शालेय समितीचे अध्यख शेख आजम वसीम, रफिक मोहंमद शेख, शेख इसहाक, शेख आबेद व इतरांनी घेतला.शिक्षणाधिका-यांचे समितीला लेखी पत्र : पत्रात काय ?पारध येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेची इमारत मोडकळीस आली असून, तसा प्रस्ताव बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी दिला आहे. शाळेत विद्यार्थी बसण्यासाठी एकही खोली उपलब्ध नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात मराठी माध्यमाच्या शाळेच्या तीन खोल्या उर्दू माध्यमाकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहे. शुक्रवारपासून या ठिकाणी वर्ग सुरू करावेत, असे शालेय समितीला दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे.
जिल्हा परिषदेतच भरली शाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:41 AM