खंडिज वीजपुरवठा; ग्राहकांची मोठी गैरसोय
जालना : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे लघू व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे, शिवाय घरगुती वीज ग्राहकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सतत निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्या दूर कराव्यात, सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परिषदेसाठी निवड
भोकरदन : तालुक्यातील उमरखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय बाल परिषदेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी सलाम मुंबई फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत यश संपादित केले होते. मुलांना ज्ञानेश्वर झगरे यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल या मुलांचे तालुक्यामध्ये सर्वत्र कौतुक केले जात आहे.
राष्ट्रीय महामागार्वरील सूचना फलक गायब
जालना : जालना-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गासह जालना-अंबड या महामार्गावरील ठिकठिकाणचे दिशादर्शक फलक, सूचना फलक गायब झाले आहेत. सूचना फलक नसल्याने वाहन चालकांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे, शिवाय अपघातप्रणव क्षेत्रातील अपघाताचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन आवश्यक तेथे दिशादर्शक, सूचना फलक बसवावेत, अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.