आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षी राज्यस्तरीय बक्षिसांची हॅट्ट्रिक साधली तर यावर्षी या कारखान्यास राष्ट्रीय स्तरावरील बक्षिसाने गौरविण्यात आले आहे. राष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाच्या बक्षिसासाठी एखाद्या कारखान्याची निवड करताना एफआरपीप्रमाणे ऊस पेमेंट करण्यासाठी निधीचे मूल्यांकन, उसापासून साखर तयार करण्यासाठी येणारा कमीत कमी उत्पादन खर्च, कारखान्याची सांपत्तिक स्थिती, कारखान्याची चालू देणी व साखरसाठा याचे प्रमाण, स्टोअर ॲण्ड स्पेअर्समध्ये कमीत कमी गुंतवणूक, प्रति मे. टन उत्पन्न प्राप्तीची कार्यक्षमता इत्यादी निकषांवर आधारित देशभरातील सहकारी साखर कारखान्यांची आर्थिक समक्षमता तपासून हे पारितोषिक देण्यात येते.
कारखाना २७ पुरस्कारांनी सन्मानित
कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याने उत्कृष्ट व्यावसायिक व्यवस्थापनाद्वारे सहकार क्षेत्रात एक उत्कृष्ट कारखाना म्हणून नावलौकिक मिळविला आहे. यापूर्वी या कारखान्यास उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, उत्कृष्ट ऊस विकास, राष्ट्रीय सहकारी उत्कृष्टता पुरस्कार इत्यादी देश व राज्य पातळीवरील २७ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
-राजेश टोपे