बदनापूर - तालुक्यातील रोशनगाव व बदनापूर महसूल मंडळांमध्ये यावर्षी दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यात मंगळवारी सर्वत्र धुवांधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तालुक्यातील कापूस, मका, सोयाबीन, बाजरीसह खरीप पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे जमिनी सुद्धा खरडून गेल्या आहेत. काही ठिकाणी रोडचे नुकसान झाले आहे तालुक्यात दि २१ सप्टे रोजी ३१० मीमी पाऊस झाला. त्यामध्ये रोषणगाव मंडळ १०२ मीमी, बदनापूर मंडळ ७५ मीमी, शेलगाव मंडळ ४१ मीमी, दाभाडी मंडळ ५६ मीमी, बावणे पांगरी मंडळात ३६ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
मंगळवारी तालुक्यात सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्पामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. धरणात मंगळवारी सकाळी साडे बारा फूट पाणी आले होते. पाण्याची आवक सुरूच असून हे धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे. भाजपा युवा मोर्चाचे ता उपाध्यक्ष व धोपटेश्वर चे माजी सरपंच नंदकिशोर शेळके म्हणाले की रोशनगाव मंडळामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति एकर अशी नुकसानभरपाई द्यावी. तसेच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्यात यावी.
तालुक्यातील अंबडगाव येथील उपसरपंच राजेश जऱ्हाड म्हणाले की, मंगळवारी या परिसरात आतापर्यंत सर्वात मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतातील उत्पन्नाच्या उरल्यासुरल्या आशा संपल्या आहेत. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तातडीने विम्याची मदत द्यावी. गेल्या आठ दिवसापूर्वी माझ्या शेतातील सोयाबीन व मोसंबीची विमा कंपनीला ऑनलाइन तक्रार करूनही त्यांच्याकडून अद्यापही पंचनामे झालेले नाही. त्यांना संपर्क केला असता त्यांनी ता कृषी अधिकारी यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला याकडेही संबंधितांनी लक्ष द्यावे.