जालना : शहरासह जिल्ह्यातील वृद्धांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात वृद्धांची संख्या किती आहे याची नोंद नसल्याचे समोर आले आहे.
एकटे राहणाऱ्या वृद्धांच्या काय अडचणी आहेत, याबाबत जाणून घेत त्यांचे प्रश्न सोडविण्याचे, मदत करण्याचे आदेश पोलिसांना असतात; परंतु एकाही पोलीस ठाण्याला वृद्धाची नोंद नाही. कोरोनाकाळात वृद्धांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत; परंतु प्रशासनाकडून त्यांना कुठल्याही प्रकारची मदत केली जात नाही. मुले-मुली करिअर, नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतात अशा वृद्धांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. त्यांच्या औषध-गोळ्या आणून देण्यासाठी रुग्णालयात नेण्यासाठीही त्यांच्याकडे माणूस नसतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
औषधी आणण्याचीही सोय नाही
अनेक ठिकाणी वृद्ध नागरिक एकटेच राहतात. मुले-मुली जावई राहत नाहीत. अशावेळी वृद्धांना प्रत्येक बाबतीत परावलंबी राहावे लागते. औषधी आणायचीही सोय नाही.
जालना शहरास जिल्ह्यात वृद्धांची संख्या मोठी आहे. त्यांचे प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत. पैसा, संपत्ती आणि वाटणीच्या कारणावरून मुले-मुली, जावयाकडून छळ केला जातो. घरातील वाद असल्याने बाहेर कुठे सहन नाही झाल्यास वृद्ध पोलीस ठाण्यात धाव घेतात.
- संपत काळे, ज्येष्ठ नागरिक
ज्येष्ठ नागरिक, पेन्शनर्सचे प्रश्न वेगवेगळे आहेत. अनेक कुटुंबांत वृद्ध मंडळी एकांतात जीवन कंठित आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी फारसे कोणी पुढे येत नाही. या काळात आजारपणे अधिक त्रस्त करणारे असते. शिवाय काही कुटुंबांत मुले-सुनांकडून त्रास दिला जातो.
- कृष्णा पवळ, ज्येष्ठ नागरिक
चंदनझिरा पोलीस ठाणे
शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेमके किती वृद्ध एकटे राहतात याचीच माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले.
सदर बाजार
पोलीस ठाणे
सदर बाजार पोलीस ठाण्याकडेही वृद्धांची आकडेवारी नाही. तक्रार आल्यानंतर मुलांना बोलावून समज दिली जाते.
कदीम जालना पोलीस ठाणे
हद्दीतही वृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. कौटुंबिक वादातून वृद्धांचा छळ केला जात असल्याचे समोर आले आहे.