लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळाने हैराण झालेल्या बळीराजाला मृग नक्षत्रात पावसाच्या सरी बरसून मनाला दिलासा मिळेल अशी आशा होती. परंतु ती फोल ठरली आहे. मृग नक्षत्राचे संपूर्ण १५ दिवस कोरडे गेल्याने शेतक-यासह बियाणे बाजाराच्या नजरा या आकाशाकडे लागून आहेत. कोट्यवघी रूपयांच्या बियाणांचा साठा शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत असून, संयुक्त आणि मिश्र तसेच रायायनिक खतांचा जवळपास ६५ हजार मेट्रिक टन साठा विक्रीविना पडून आहे.जालना जिल्ह्यात जवळपास पाच लाख ८० हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. सध्या केवळ भोकरदन आणि परतूर तालुक्यात शंभर ते दीडशे शेतकºयांनी पेरणी केल्याचे सांगण्यात आले.बीटी बियाणांच्या वेगवेगळ्या पाच ते सात कंपन्यांच्या बीटी बियाणांची जवळपास आठ लाख २५ हजारांपेक्षा जास्त पाकिटे बाजारात दाखल झाली आहेत. पूर्वी बियाणांची टंचाई निर्माण होत होती, ती आता इतिहासजमा झाली आहे. पावसाने यंदा मोठी हुलकावणी दिल्याने मुगाच्या पेरणीवर यांचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. असे असले तरी जालना जिल्ह्यात गेल्या दहा वर्षाचा विचार केल्यास आषाढी एकादशीनंतरच पेरणी झाल्याचे दिसून येते. मुगाचे उत्पादन हे सरासरी ८० दिवसांमध्ये निघते. त्यामुळे पोळा सणाला नवीन मूग बाजारपेठेत येतो, परंतु यंदा तशी चिन्हे धूसर दिसत आहेत.जालना ही बियाणांची राजधानी म्हणून ओळखली जाते. यंदा स्थानिक बियाणे कंपन्यासह आंध्र प्रदेशातील बीटी बियाणे कंपन्यांनी चांगलेच हातपाय रोवले आहेत. यंदा बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी आठ भरारी पथके नियुक्त केली आहेत, असे असताना अद्याप या पथकांना कुठलेच काम नाही. पाऊस लांबल्याने एकूणच जालन्यातील बाजारपेठेत मरगळ आल्याचे चित्र आहे.किरकोळ स्वरूपाचे शेती उपयोगी साहित्य खरेदी करतांना शेतकरी दिसत आहे. यंदा अद्यापही पावसापासून बचाव करण्यासाठी लागणारे प्लास्टिकची पन्नी विक्रीही पाहिजे तशी झाली नसल्याचे व्यापाºयांनी सांगितले. एकूणच जालन्यासह तालुका पातळीवरील बाजारपेठेत पूर्वी प्रमाणे उत्साह दिसून येत नाही.२२ जूनपासून पावसाचा अंदाजवायू चक्री वादळाने यंदा पाऊस लांबवल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. येत्या तीन दिवसांत चांगल्या पावसास प्रारंभ होऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यात ख-या अर्थाने खरिपाच्या पेरणीस प्रारंभ होणार आहे.या संदर्भात कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राकडून शेतक-यांना पेरणीची घाई न करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. २० जून उजाडला असला तरी प्रचंड उकाड्याने सामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
शेतकऱ्यांसह बियाणे बाजाराच्या नजरा ढगांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:34 AM