जालना : शहरातील पाच ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या एका चोरट्यास गुन्हे शाखेेने जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली असून, त्याच्याकडून चार एलईडी, दागिने, साड्या असा जवळपास ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जालना शहरातील विविध भागातील चोऱ्यांमध्ये सुनील संतोष कांबळे (रा. नूतन वसाहत, जालना) याचा हात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली हाेती. या माहितीनुसार पोलिसांनी सुनील कांबळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी कांबळे याने त्याच्या साथीदारासह घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चार एलईडी, साड्या, दागिने असा ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्या दोघांनी कदीम पोलीस ठाणे हद्द, जालना तालुका हद्दीत चोऱ्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पकडलेल्या आरोपीस कदीम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, हवालदार सॅम्युअल कांबळे, सचिन चौधरी, देविदास भोजने, परमेश्वर धुमाळ, विलास चेके, रवी जाधव, शमशाद पठाण यांच्या पथकाने केली.