लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती मोहिमेंतर्गत दोन लाखांच्या आत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या कर्जमुक्ती प्रक्रियेत येणा-या अडचणी जाणून घेण्यासाठी सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी प्रायोगिक तत्त्वावर जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी व टेंभुर्णी या दोन गावांतील कर्जमुक्तीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द होणार आहेत.महाविकास आघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रारंभीच्या टप्प्यात कर्ज खात्याशी आधार नंबर लिंक नसलेल्या शेतक-यांचा आधार क्रमांक लिंक करून घेण्यात आला. त्यानंतर बँकांमार्फत दोन लाखाच्या आत कर्ज थकीत असलेल्या शेतक-यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातून जवळपास १ लाख ८० हजार शेतक-यांची माहिती या पोर्टलवर भरण्यात आली आहे. यात जालना तालुक्यातील साधारणत: २७ हजार, घनसावंगी तालुक्यातील २३ हजार, बदनापूर तालुक्यातील १४ हजार, मंठा तालुक्यातील १४ हजार, भोकरदन तालुक्यातील २८ हजार, जाफराबाद तालुक्यातील २३ हजार, अंबड तालुक्यातील २६ हजार तर परतूर तालुक्यातील साधारणत: १६ हजार शेतक-यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर केल्यानंतर या कर्जमुक्ती प्रक्रियेत कोणत्याही चुका राहू नयेत, यादीत चुकीची माहिती येऊ नये, शेतक-यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनस्तरावरून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील लाभार्थी शेतक-यांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यातील ६८ गावांची यासाठी निवड झाली आहे. जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी (ता.घनसावंगी) व टेंभुर्णी (ता. जाफराबाद) या गावांचा यात समावेश आहे. टेंभुर्णी येथील जवळपास ७४३ शेतक-यांची तर तीर्थपुरी येथील जवळपास ८६० शेतक-यांची माहिती शासकीय पोर्टलवर भरण्यात आली असून, सोमवारी लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द होणार आहे.शेतक-यांना या कागदपत्रांची लागणार आवश्यकताकर्जमुक्ती यादीत नाव आल्यानंतर लाभार्थी शेतक-यांनी आपलं सरकार केंद्रात जाताना शासकीय कर्जमुक्ती यादीत आपल्या नावासमोर आलेला विशिष्ट क्रमांक, आपले आधार कार्ड, आपला मोबाईल आणि बँकेचे पासबूक घेऊन जाणे गरजेचे आहे.याद्या सोमवारी होणार प्रसिध्द !प्रायोगिक तत्त्वावरील याद्या सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. या याद्या बँक, आपलं केंद्र, ग्रामपंचायतीवर प्रसिध्द झाल्यानंतर यादीत नाव असलेल्या शेतक-यांनी कर्जमुक्तीची रक्कम मान्य असेल तर थंब करावे किंवा मान्य नसेल तर थंबद्वारे जिल्हा समितीकडे आॅनलाईन तक्रार नोंदविणे आवश्यक आहे.या प्रक्रियेनंतर २८ फेब्रुवारीनंतर जिल्ह्यातील कर्जमुक्तीस पात्र असलेल्या सर्व शेतक-यांच्या याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत.
कर्जमुक्तीसाठी प्रायोगिक तत्त्वावर दोन गावांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:29 AM