जालना : शहरातील एका मंगल कार्यालयात काम करून उदरनिर्वाह चालविणारे शिवाजी बावणे (देशमुख) यांचा मुलगा प्रसाद बावणे याची राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान रायपूर येथे निवड झाली आहे. प्रसादने जेईई मेन्समध्ये देशातून ६९ हजारावी रँक मिळवली आहे.
प्रसाद हा मूळ बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी येथील आहे. घरची परिस्थिती नाजूक असल्याने त्याचे वडील शिवाजी बावणे जालना येथे स्थायिक झाले. कधी सुरक्षारक्षक तर कधी कंपनीत काम करून बावणे यांनी प्रसादाला शिकवले. प्रसाद लहानपणापासूनच हुशार होता. बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये संशोधन करून आजारी लोकांचे जीवन सुसह्य करण्याचा मानस त्याने व्यक्त केला होता. त्याच्या आई-वडिलांनी नातेवाईक व सावकारांकडून कर्ज काढून त्याला कोटा येथे शिक्षणासाठी पाठवले. मेहनत व जिद्दीच्या बळावर जेईई मेन्समध्ये देशातून ६९ हजारावी रँक त्याने मिळविली. घरातील प्रतिकूल परिस्थिती मला शिकवत गेली. अभ्यास करत असताना लोकांच्या कार्यात काम करणारी आई व मंगल कार्यालयात काम करणारे वडील आठवयाचे. त्यामुळे आणखी ऊर्जा मिळायची, असे प्रसाद बावणे याने सांगितले.