पालिकेसह लीड बँकेचा पुढाकार; ‘मी पण डिजिटल’ अभियानाचा शुभारंभ
जालना : पंतप्रधान आत्मनिर्भर अभियानांतर्गत फेरीवाल्यांना आपला व्यवसाय उभारणे, तसेच त्यात वृद्धी करण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी आता नगरपालिका, जिल्हा अग्रणी बँकेने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने ४२ फेरीवाल्यांना प्रत्येकी १० हजार याप्रमाणे चार लाख २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्यक करण्यात आले, तसेच शाखा व्यवस्थापक विजय सोनकुसरे यांच्या हस्ते ‘मी पण डिजिटल’ या यूपीआय पेमेंट सुविधेअंतर्गत पथविक्रेत्यांना यूपीआय कोडचे वितरण करण्यात आले.
येथील बँक ऑफ इंडिया शाखेत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत ईलमकर, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक विजय सोनकुसरे, प्रियांका जाधव, कारभारी तळेकर, नगरपालिकेचे पांडुरंग डाके, विजय सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना सोनकुसरे म्हणाले की, लॉकडाऊन उठल्यानंतर आता छोट्या व्यवसायांना गती येत आहे. या काळात फेरीवाल्यांना व्यवसाय उभारणीसाठी अर्थसाहाय्य व्हावे, याकरिता आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत प्रधानमंत्री स्वनिधी कर्ज वाटप करण्यात येत आहे. व्यावसायिकांनी केवळ अनुदानाचा विचार न करता आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले. कोरोना काळात डिजिटल व्यवहार वाढल्याने मी पण डिजिटल या उपक्रमांतर्गत गरजूंना क्युआर कोडचे वाटप सोनकुसरे यांच्या हस्ते करण्यात आले. डिजिटल व्यवहार करताना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. राजन साळवे, शिवाजी देहतकर, कृष्णा घायाळ, चक्रधर बिस्वाल, राजेश व्यवहारे, आदित्य पांडे, अलोक हरजुले यांच्यासह लाभार्थ्यांची उपस्थिती होती.
फोटो
मीही डिजिटल अभियानांतर्गत फेरीवाल्यांना क्युआर कोडचे वाटप करताना विजय सोनकुसरे, प्रशांत ईलकर आदी.