लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तक्रारदाराच्या कामासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषद निरंतर शिक्षण कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात आली.नरेंद्र छगन साळुंके असे वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. तक्रारदार हे निरंतर शिक्षण विभागातून सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करून वेतन पडताळणीसाठी पाठवून मंजुरीसाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविण्याची मागणी वरिष्ठ लिपिक नरेंद्र साळुंके यांच्याकडे त्यांनी केली होती. मात्र, साळुंके यांनी या कामासाठी लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सापळा रचण्यात आला.तक्रारदाराच्या कामासाठी लाचेची मागणी करून दोन हजार रूपये स्वीकारल्यानंतर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक रवींद्र निकाळजे, पोनि विनोद चव्हाण, संतोष धायडे, ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, उत्तम देशमुख, गंभीर पाटील, ज्ञानेश्वर म्हस्के, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, रमेश चव्हाण, खंदारे, शेख यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
‘निरंतर’चा वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 12:42 AM