लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान मतदान कार्ड, आधार कार्डापासून सुटका होणार असल्याने ज्येष्ठ नागरिक ‘स्मार्ट कार्ड’च्या नोंदणीसाठी जालना बसस्थानकात गर्दी करीत आहेत. मात्र, त्यांची येथे विविध कारणांनी हेळसांड होत असल्याने ज्येष्ठांमधून नाराजी व्यक्त होत आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाने आधुनिक पद्धतीचा विचार स्वीकारून ‘स्मार्ट कार्ड’ योजना अंमलात आणली आहे. यामुळे सध्या स्थितीत जालना बसस्थानकात स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू आहे. यासाठी जालना परिसरातील शेकडो नागरिक नियमित सकाळी ८ वाजल्यापासूनच बसस्थानकात रांगा लावीत आहेत. परंतु, येथे एकच खिडकी सुरू असल्याने लाभार्थ्यांची गर्दी होत आहे. त्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. यात स्मार्ट कार्डची नोंदणी करताना ओटीपीसाठी मोबाईल जवळ असणे गरजचे आहे. परंतु, शेकडो जणांना मोबाईलचा वापर करता येत नाही. यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. स्मार्ट कार्डसाठी आॅनलाईन झाल्यानंतर त्यांना १० ते १५ दिवसात ‘स्मार्ट कार्ड’ आगारातर्फे देण्यात येत आहे. यानंतर लाभार्थ्याला प्रवासात इतर कागदपत्रे जवळ ठेवण्याची गरज नाही.‘स्मार्ट कार्ड’ची नोंदणी करण्यासाठी ‘थंब’ बंधनकारक आहे. परंतु, अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांची झीज झालेली आहे. त्यामुळे त्यांचे ‘थंब’ होत नसल्याने असंख्य ज्येष्ठ नागरिकांना या ‘स्मार्ट कार्ड’पासून वंचित राहावे लागत आहे.तसेच मतदान कार्ड व आधार कार्ड यावरील जन्म तारीख सारखी असावी, असे महामंडळाकडून नोंदणी करण्यासाठी आलेल्यांना सांगितले जात आहे. परंतु, अनेकांची ही नोंद वेगवेगळी आहे. त्यामुळे नोंदणी करण्यासाठी आलेल्यांचा हिरमोड होत आहे.
‘स्मार्ट कार्ड’साठी ज्येष्ठांची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:09 AM