- शिवचरण वावळेजालना : मागील काही दिवसांपासून स्त्री रुग्णालयातील महिलांच्या प्रसूती वाॅर्डासह जनरल विभागातील पलंगावरील गादीवर बेडशीट अंथरण्यात येत नाहीत. त्यामुळे प्रसूतीसीठी आलेल्या गर्भवती महिलांना घरून बेडशीट घेऊन यावे लागत आहे. याविषयी स्त्री रुग्णालयातील वरिष्ठांना आणि वाॅर्डातील कर्मचाऱ्यांना विचारले असता कुणी म्हणते चोरीला गेले, तर कुणी म्हणते धुण्यासाठी दिले आहेत. रुग्णालयातील गादीवरील बेडशीट गायब होण्यामागचे नेमके गौडबंगाल काय हे समजू शकले नाही.
जिल्ह्यातील १०० खाटांचे अद्ययावत असे स्त्री रुग्णालय असल्याने प्रसूतीसाठी गर्भवती महिलांची या रुग्णालयास सर्वाधिक पसंती असते. इथे आरोग्यविषयक सुविधा चांगल्या मिळत असल्याने अगदी काही वर्षांतच रुग्णालयाचा नावलौकिक चांगलाच वाढली आहे. मात्र, इथे येणारे रुग्ण हे नेहमीच मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचे किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे ओळख सांगून रुग्णालयातील मालमत्ता वापरताना निष्काळजीपणा करताना दिसून येतात. त्यांना कुणी जाब विचारल्यास अनेक वेळा कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकारदेखील येथे घडले आहेत. त्यामुळे रुग्णालयात मनमानी करणाऱ्या नातेवाइकांकडे फारसे कुणी लक्ष देत नाही. याचाच फायदा घेत रुग्णालयातील बेडवरील बेडशीट काहींनी घरी नेल्याची तक्रार केली जात आहे. यावर विश्वास ठेवला तरी एखाद्या रुग्णाचा नातेवाईक किंवा रुग्णाने गादीवरील बेडशीट घरी नेले असले तरीदेखील रुग्णालयातील सर्वच्या सर्वच बेडशीट कुणी घरी कसे घेऊन जाईल हे न पटण्यासारखेच असल्याचे काहीजण खासगीत सांगतात.
दुसरीकडे बेडशीट खूप घाण झाले होते, ते आजच धुण्यासाठी पाठवले असल्याचे कर्मचारी यांच्याकडून सांगितले जाते. त्यामुळे विश्वास नेमका कुणावर ठेवायचा, स्त्री रुग्णालयातील वरिष्ठांवर की वाॅर्डातील कर्मचाऱ्यांवर, हा मोठा प्रश्न नातेवाइकांना पडला आहे. त्यामुळे स्त्री रुग्णालयातील गाद्यांवरील बेडशीट रुग्णांच्या नातेवाइकांनी घरी नेले की, धुण्यासाठी पाठवले की, अजून कुणी तिसऱ्याच व्यक्तीने बेटशीट चोरले हा संशोधनाचा विषय असून, वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणीही नातेवाईक करीत आहेत.
चौकशी केली जाईलअनेक वेळा स्त्री रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या सोबत येणारे नातेवाईक मनमानी करतात. त्यांना सांगण्यासाठी गेल्यास कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येतात. बेडशीट धुण्यासाठी टाकले असतील. काही बेडशीट गायब असतील तर त्या प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्याबाबत अधिक माहिती घेऊन नातेवाइकांची गैरसोय दूर केली जाईल.-डॉ. प्राची तारशेट्टीवार, अधीक्षक शासकीय स्त्री रुग्णालय