जालना : महिलांसाठी महत्त्वाचा असलेला मकर संक्रांतीचा सण जवळ आला आहे; परंतु या सणाच्या पार्श्वभूमीवर साखर वगळता तीळ, गुळाचे दर वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे या सणातील आर्थिक गणित बिघडणार आहे.
मकर संक्रांत सण जवळ येऊ लागला आहे. या सणानिमित्त महिला वर्गातूनही आतापासूनच तयारी केली जात आहे. ऐन सणाच्या पार्श्वभूमीवर सणासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर वाढणार असल्याने महिला बाजारपेठेत तीळ, गूळ, साखरेची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्याशिवाय इतर साहित्याचीही मागणी वाढली आहे. मात्र, बाजारपेठेत साखरेचे दर स्थिर असले तरी तीळ आणि गुळाचे दर मात्र, काही प्रमाणात वाढले आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने दरवाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. असे असले तरी वाढलेल्या दरामुळे गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.
तीळ भाव
गत काही दिवसांपूर्वी तिळाचे भाव १०० ते १२० रुपये किलो होते. मात्र, संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर तिळाचे दर हे १५० ते २०० रुपये किलोवर गेले आहेत. गत काही महिन्यांतील ही सर्वाधिक वाढ आहे.
गूळ भाव
गुळाचे दर बाजारात होणाऱ्या कमी- अधिक आवक यावरून कमी- अधिक होतात. गत आठवड्यात काही प्रमाणात गुळाचे दर वाढले आहेत. गूळ २४०० ते ३२०० रुपये क्विंटलने विक्री केला जात आहे.
साखरेचे भाव
सध्या बाजारातील साखरेचे दर स्थिर आहेत. साखर ३३०० ते ३५०० रुपये क्विंटलने विक्री केली जात आहे. त्यामुळे साखर वगळता गूळ आणि तिळाचे दर ऐन मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर वाढले आहेत.
वाया गेलेला खरीप हंगाम आणि कोरोनामुळे ठप्प असलेले व्यवसाय यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन सणाच्या पार्श्वभूमीवर तीळ, गुळाचे दर वाढल्याने खर्च वाढणार आहे.
- ज्योती खैरे, गृहिणी
बाजारपेठेत सध्या साखरेचे दर स्थिर आहेत. त्यात वाढ झालेली नाही; परंतु तीळ आणि गुळाचे दर वाढले आहेत. बाजारपेठेत मालाची आवक कमी झाल्याने ही दरवाढ झाल्याचे दिसून येत आहे.
- पप्पू राऊत, व्यापारी