लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात गुरूवारी गणेश विसर्जन मिरवणुका निघणार असून, या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्यासह ९० अधिकारी व ९०७ कर्मचारी तैनात राहणार आहेत. शिवाय होमगार्डसह विशेष पथकेही कार्यरत राहणार आहेत.गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस दलाच्या वतीने ठिकठिकाणी बैठका घेण्यात आल्या होत्या. तसेच दिवस-रात्रीची गस्तही वाढविण्यात आली होती. गुरूवारी श्रींच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, ६६ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ९०७ पोलीस कर्मचारी यात ८६८ पुरूष व १०३ महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याशिवाय ४२६ होमगार्ड, ४७ महिला होमगार्ड व एसआरपीच्या दोन प्लेटून तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय साध्या गणवेशातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची पथकेही बंदोबस्तकामी तैनात करण्यात आली आहेत. शिवाय विसर्जन मिरवणूक मार्गावर फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. स्वयंसेवी कार्यकर्ते यांचीही या कामी मदत घेतली जाणार आहे.४४ वाहने दिमतीलामिरवणुका शांततेत व्हाव्यात, यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याशिवाय अतिरिक्त ४४ वाहनेही बंदोबस्त कामी अधिकारी, कर्मचा-यांच्या दिमतीला राहणार आहेत.सूचनांचे पालन करावेगणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मिरवणुकांसाठी वाहतूक मार्गात तात्पुरते बदलशिवाजी पुतळा ते गरीबशहा बाजार,फूलबाजार ते काद्राबाद मस्जिद, सावरकर चौक ते महावीर चौक या मार्गावरील वाहतूक १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक शिवाजी पुतळा, नरहरी चौक, जेईएस कॉलेज, बुंदेले चौक, सोमेश टेम्पो, बाबूराव काळे चौक, मुर्गी तलाव, सूर्या हॉटेल, जुना मोंढा व बसस्थानक मार्गाने वळविण्यात आली आहे.फूलबाजार ते अकेली मस्जिद, शोला चौक ते सदर बाजार जालना, बडी सडक या मार्गावरील वाहतूक दुपारी ३ वाजता बंद होणार आहे. ही वाहतूक जेईएस कॉलेज, मुर्गी तलाव, शिवाजी प्रेस, जुना मोंढा, बसस्थानक मार्गे वळविण्यात आली आहे.मुर्गी तलाव ते राम मंदिर ते शिवाजी चौक या मार्गावरील वाहतूक सायंकाळी ६ वाजता बंद केली जाणार आहे. ही वाहतूक जेईएस कॉलेज, मुर्गी तलाव, जुना मोंढा व बसस्थानक मार्गे वळविण्यात आली आहे.अंबड चौफुली ते सिटीजन टी पॉइंट या मार्गावरील वाहतूक सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत बंद केली जाणार आहे. ही वाहतूक भोकरदन चौफुली, कन्हैय्या नगर, मंठा चौफुली या मार्गावरून वळविण्यात आली आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी तगडा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:58 AM