लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील औद्योगिक वसाहतीमधील दोन कंपन्यांमधील सुरक्षारक्षकाला मारहाण करत दरोडा टाकणाऱ्या टोळीतील सात संशयितांना मुंबईच्या घाटकोपर भागातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडू चोरीतील मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेला ट्रक, असा एकूण २२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षकांनी रविवारी याबाबत माहिती दिली.औद्योगिक वसाहतीमधील शीला व पंकज इंडस्ट्रीमध्ये २१ मार्चच्या मध्यरात्री आठ ते नऊ चोरट्यांनी कंपनीतील सुरक्षारक्षकांना चाकूचा धाक दाखवून त्याचे हातपाय बांधून टाकत ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी वापरले जाणारे तांब्याच्या तारा, पट्टी, स्क्रॅप, ब्रॉस रॉड, एलसीडी, मोबाईल व दुचाकी, असा एकूण १३ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी पथकासह घटनास्थळी बारकाईने पाहणी करून तपास सुरू केला. त्यासाठी खब-यांना कामाला लावले. दरम्यान, औद्योगिक वसाहतीत चोरी करणारे संशयित मुंबईतील घाटकोपर भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतील मुंब्रा, घाटकोपर जाऊन संशयित अब्दुल्ला जमीरउल्ला अन्सारी (३१, रा. तेनवा, उत्तरप्रदेश), अब्दुल सईम महंमद युनूस (२२,रा.सत्तवाडी, सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश), असलम अली अक्रम अली (३१ घाटकोपर, मुंबई ), अब्दुल सलीम खान (४२ घाटकोपर, मुंबई) मोहंमद इम्रान नियाजोद्दिन ( २७, रा. सिपलीनगर, ठाणे), अकबर अबीद खान (४५, कुर्ला मुंबई) इरशाम अहमेद खान ( ३१, मुंब्रा, ठाणे) यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले.चौकशीत त्यांनी औद्योगिक वसाहतीमधील चोरीची कबुली दिली. तसेच चोरलेला १३ लाख ८७ हजारांचा मुद्देमालही काढून दिला. गुन्ह्यात वापरलेला नऊ लाखांचा ट्रकही पोलिसांनी जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी संशयितांना मुद्देमालासह जालना येथे आणले. त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक सुनील इंगळे, सहायक उपनिरीक्षक शेख रज्जाक, विश्वनाथ भिसे, संतोष सावंत, प्रशांत देशमुख, कैलास जावळे, समाधान तेलंग्रे, वैभव खोकले, रंजित वैराळ यांनी ही कारवाई केली.मुंब्रा भागात संशयित दरोडेखोरांना पकडण्यासाठी प्रथम गुन्हे शाखेच्या तीन कर्मचाºयांचे एक पथक मुंबईतील मुंब्रा भागात गेले. मात्र, दरोडेखोरांच्या संख्या अधिक असल्याची माहिती खब-यांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांना दिली. त्यानंतर जालन्याहून खाजगी वाहनोन पुन्हा एक पथक रवाना करण्यात आले. एकाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला साथीदारांना पार्टी करण्यासाठी एकत्र बोलावण्यास सांगितले. पैकी तिघे एकत्र येताच त्यांना ताब्यात घेतले.सातही संशयितांना पाच वाजता न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सात दरोडेखोर मुंबईच्या घाटकोपर भागातून गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:37 AM