फोटो आहे
विकास व्होरकटे
जालना : शहरातील आगारात मागील वर्षभरापासून सुरू असलेले स्वच्छतागृहासह कँटिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याबरोबरच बसस्थानकात लालपरीसाठी नव्याने सहा ते सात प्लॅटफार्म तयार केले जात असून, याचे काम महिनाभरात पूर्ण होणार आहे.
जालना जिल्ह्यातून रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. शिवाय बाहेरील जिल्ह्यातील बसेसही आगारात मोठ्या प्रमाणात येतात. परंतु, मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी बसेसला बसस्थानकात थांबण्यासाठी प्लॅटफार्म नाही. त्यामुळे मुंबई, पुणे आदी मार्गावर धावणाऱ्या बसेस बसस्थानकाच्या समोर जागा मिळेल तेथे थांबतात. यात बस पकडण्यासाठी प्रवाशांची अनेकदा मोठी गैरसोय होते.
बसस्थानकात नियमित असलेल्या प्रवाशांची संख्या पाहता पूर्वी बसस्थानकाची इमारत कमी पडत होती. मागील वर्षभरापासून बसस्थानकात नव्याने एका इमारतीची बांधणी करण्यात येत आहे. यासाठी १ कोटी ४० लाख रुपयांचे बजेट आहे. यात कँटिंगसह स्वच्छतागृह व सहा ते सात प्लॅटफार्म उभारण्यात येत आहेत. आजवर याचे कामही पूर्ण झाले असते. परंतु, मध्यंतरी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने बांधकाम बंद होते. सध्या स्वच्छतागृहासह कँटिंगचे काम किरकोळ स्वरूपात राहिलेले आहे. तर प्लॅटफार्मचे काम सुरू आहे. हे काम एक ते दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. सध्या आगारात नऊ प्लॅटफार्म आहेत. परंतु, हे प्लॅटफार्म ठराविकच बसेससाठी आहे. नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्लॅटफार्मवर औरंगाबाद, पुणे आदी ठिकाणच्या बसेस लागणार आहेत, अशी माहिती आगारप्रमुख पंडित चव्हाण यांनी दिली.
काम अंतिम टप्प्यात
जालना आगाराचे आगारप्रमुख पंडित चव्हाण म्हणाले, बसस्थानकात मागील वर्षभरापासून सुरू असलेले काम मध्यंतरी कोरोनामुळे बंद पडलेले होते. सध्या काम सुरू आहे. यात स्वच्छतागृह व कँटिंगचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. याबरोबरच बसस्थानकात होत असलेले सहा ते सात प्लॅटफार्मचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे. येथे पुणे, औरंगाबादसह इतर ठिकाणच्या बसेस लागणार आहेत. त्यामुळे बसेस पकडण्यासाठी प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.