जालना : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत गाय गोठा बांधकामासाठी मंजूर अनुदानाचा दुसरा हप्ता देण्यासाठी सात हजारांची मागणी करून पाच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करणाऱ्या कंत्राटी अभियंत्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. ही कारवाई बुधवारी मंठा पंचायत समितीत करण्यात आली.महेश अंकुशराव बोराडे (रा. मंठा फाटा) असे कारवाई झालेल्या अभियंत्याचे नाव आहे.
मंठा तालुक्यातील एका तक्रारदाराला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत गाय गोठा बांधण्यासाठी ७७ हजार रुपये अनुदान मंजूर झाले होते. त्यापैकी पहिला हप्ता ९ हजार रुपये देण्यात आला होता. परंतु, दुसऱ्या हप्त्याचे अनुदान देण्यासाठी एमआरईजीएस विभागातील कंत्राटी अभियंता महेश अंकुशराव बोराडे याने १२ मे रोजी मंठा पंचायत समिती कार्यालयातच पंचांसमक्ष तक्रारदाराकडे सात हजार रुपये लाचेची मागणी केली.
अखेर तडजोडीअंती पाच हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. या लाच मागणीची पडताळणी १२ मे, २१ मे आणि २२ मे रोजी करण्यात आली. लाचेची मागणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अभियंता बोराडे याला ताब्यात घेतले असून, या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक किरण बिडवे, पोनि. सुजित बडे, शिवानंद खुळे, जावेद शेख, संदीपान लहाने, गणेश बुजाडे, भालचंद्र बिनोरकर यांच्या पथकाने केली.