जालना : गत सात वर्षे जालना नगरपालिकेने पथदिव्यांचे वीज बिल थकविल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरलेल्या रस्त्यावरील अंधार आता दूर होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विशेष बाब म्हणून मंजूर करवून घेतलेल्या साडेबारा कोटी रकमेतील काही रकमेचा विनियोग जालना नगरपालिकेने वीज बिल भरण्यासाठी अदा करण्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी मिळण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना शनिवारी दिले.शहागड -अंबड- जालना या दहा किलोमीटर पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन येडशी- औरंगाबाद या रस्त्याचे चौपदरीकरणात गेल्यामुळे खा. रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भरपाई देण्याची मागणी केली होती. विशेष बाब म्हणून यासाठी लागणारा १२ कोटी ३५ लाखांचा निधी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजूर केला. सदर रक्कम खा. दानवे यांच्या आणि विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी आ. नारायण कुचे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक भास्कर दानवे, प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, माजी महापौर भगवान घडामोडे, अशोक पांगारकर, देविदास देशमुख, बद्रीनाथ पठाडे, सिद्धीविनायक मुळे, नगरसेवक सतीश जाधव, शशिकांत घुगे, चंपालाल भगत, राजेश बाबरेकर, अमोल पाटील, योगेश विधाते, कार्यकारी अभियंता महेश पाटील, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर उपस्थित होते.
जालन्यातील सात वर्षांचा अंधार हटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:08 AM