लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, तालुक्यात ६० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तसेच ३६ गावांमध्ये ४२ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.गतवर्षी पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. तालुक्यात प्रशासनाकडून ६० टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून, ३६ गावांसाठी ४२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे एस. एस. पैठणकर यांनी दिली.दरम्यान, प्रशासनाकडून टँकरच्या प्रस्तावांना तात्काळ मजूंरी देण्यात येत आहे. तसेच टंचाई निवारण्यासाठी मंजूर असलेल्या कृती आराखड्याच्या माध्यमातून विशेष दुरुस्ती योजना, हातपंप दुरुस्ती, विहिरींचे अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा ही कामे युद्धपातळीवर सुरू आहे. असे असतांनाही अनेक गावे मात्र तहानलेली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.दरम्यान, मंठा पंचायत समितीमध्ये २४ मे रोजी घेण्यात आलेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधितावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पंचायत समितीचे उपसभापती कल्याण खरात यांनी केली आहे.
मंठा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:01 AM