ऑनलाइन लोकमतजालना, दि. 10 - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची शेतक-यांबाबत बोलताना जीभ घसरली आहे. एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात "साले", असं म्हणत रावसाहेब दानवेंनी शेतक-यांची एक प्रकारे अवहेलना केली आहे. जालन्यात कार्यकर्ता मेळाव्यात रावसाहेब दानवे बोलत होते. ते म्हणाले इतकी तूर खरेदी करूनही यांचे रडगाणे सुरूच आहे, दर नाही दर नाही असली रडगाणी आता बंद करा, असा इशाराही रावसाहेब दानवेंनी शेतक-यांना दिला आहे. कापूस, तूर आणि डाळीला भाव नाही असली रडगाणी बंद करा, अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळली आहेत. त्याच वेळी दानवेंनी यांनी शेतक-यांबाबत बोलताना शेलक्या भाषेचा वापर केला आहे. भाजपाच्या एका कार्यकर्त्यानं दानवेंना तूर खरेदीबाबत लोकांना काय उत्तर द्यायचं असा प्रश्न केला असता त्याला प्रत्युत्तर देताना दानवेंची चांगलीच जीभ घसरली आहे. राज्य सरकारनं एक लाख टन तूर खरेदी केली तरी लोक रडतात साले, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्यावरच आगपाखड केली आहे. रावसाहेब दानवेंच्या हस्ते पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. याआधीही रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.नोटाबंदी केल्यानंतर दानवे म्हणाले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर सर्वांना धक्का बसला. मात्र, तुमच्याकडे नोटा असतील तर माझ्याकडे द्या, मी बदलून देतो आणि आपल्याजवळ कुठे नोटा बंद आहेत?. तसेच गेल्या वर्षी अख्ख्या मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता, मात्र आम्ही मुद्दाम फाडून सांगायचो की, खूप दुष्काळ आहे. माणसं स्थलांतर करत आहेत, जनावरं मरत आहेत आणि हे खोटे चित्र उभे आम्ही करत होतो. याचा परिणाम असा झाला की 68 वर्षांत पहिल्यांदा 4200 कोटींची मदत मिळाली.ह्व, असं धक्कादायक वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं होतं. पैठणमधील एका प्रचारसभेत बोलताना रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा., असं वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. तसेच काही दिवसांपूर्वीच रावसाहेब दानवेंनी विरोधकांना उद्देशूनही बेजबाबदार विधान केलं होतं. कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावं आणि त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असं दानवे म्हणाले होते. दानवेंच्या या वक्तव्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टींनीही खरपूस समाचार घेतला आहे. शेतक-यांना गृहीत धरू नका, दानवेंना शेतक-यांबाबत काय वाटतं हे स्पष्ट झालं आहे. भाजपाचे अच्छे दिन कधी येणार आहेत, असा सवालही शेट्टींनी भाजपाला विचारला आहे. तर काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी रावसाहेब दानवेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात "साले"- दानवे
By admin | Published: May 10, 2017 6:26 PM