- श्याम पाटीलसुखापुरी (जि. जालना ): सध्या राज्यात राजकीय पेच निर्माण झालेला असून, नव्याने स्थापन झालेल्या सरकारला कायदेशीर बाबीला सामोरे जावे लागणार आहे. शरद पवारांनी जादूची कांडी फिरवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अडीच वर्षे बोनस म्हणून सत्ता मिळाली होती, अशा शब्दात माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य केले. अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील विकासकामांच्या भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते.
मंत्रीपदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात आपण सुखापुरीत बारा ते तेरा कोटी रुपयांची कामे मंजूर केली होती. त्यापैकी काही कामे पूर्ण झाली असून, काही प्रगतीपथावर आहे. मंत्री असताना विकास कामे अधिकच जोमाने केले. आता मी आमदार असलो तरी विकासकामे थांबणार नाहीत,अशी ग्वाही टोपे यांनी दिली.
तसेच सध्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, नवीन सरकारला अनेक कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागणार आहे. आपल्याला आतापर्यंत मिळालेली अडीच वर्ष ही बोनस म्हणून मिळालेली होती. पवार साहेबांनी जादूची कांडी फिरवली अन् ही अडीच वर्षांची सत्ता मिळाली, असेही टोपे म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, सुखापुरीचे सरपंच भगवान राखुंडे, प्रताप राखुंडे, रईस बागवान, बाळू गाडे, दीपक राखुंडे, दिलीप खोजे, फकीर मोहम्मद बागवान तसेच परिसरातील नागिरक मोठया संख्येने उपस्थित होते.