इमारतीची दयनीय अवस्था : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
लेहा : भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची गेल्या अनेक वर्षभरापासून दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे सध्या या उपकेंद्राचा कारभार व्यायामशाळेत सुरू आहे. इमारत नसल्याने आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचारी हैराण झाले आहे.
शेलूद उपकेंद्रांतर्गत वडोदतांगडा, शेलूद व लेहा ही तीन गावे येतात. या गावांची लोकसंख्या जवळपास ९ हजारांच्या जवळपास आहे. येथील नागरिकांना उपचार मिळावे, यासाठी काही वर्षांपूर्वी धावडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत शेलूद येथे उपकेंद्र सुरू करण्यात आले. सुरुवातीला हे उपकेंद्र एका इमारतीत सुरू करण्यात आले होेते. परंतु, काही दिवसांपासून सदरील इमारतीची दयनीय अवस्था झाली. भिंतीला तडे जाणे, फुटलेल्या खिडक्या, अस्वच्छता व शौचालयाची झालेली दुरवस्था आदी कारणांमुळे सदरील इमारतीत रुग्णांवर उपचार करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन आरोग्य विभागाने सदरील इमारत बंद करण्याचा निर्णय घेतला. व आरोग्य उपकेंद्र कधी जिल्हा परिषद शाळेत तर कधी व्यायामशाळेत सुरू करावे लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या उपकेंद्राचा कारभार व्यायामशाळेत सुरू आहे. येथे कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी हैराण झाले आहेत.
सध्या देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. शिवाय, शासकीय रूग्णालयांसह आरोग्य केंद्रांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. परंतु, शेलूद येथील उपकेंद्राला इमारत नसल्याने सदर केंद्राचा कारभार व्यायाम शाळेत सुरू आहे.
उपकेंद्राला इमारत देण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता उपकेंद्र व्यायामशाळेत सुरू आहे. तेथे येणाऱ्या रुग्णांना सोयी-सुविधा मिळत नाही. याकडे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लक्ष द्यावे.
सोन सुरडकर, नागरिक
उपकेंद्राला इमारत नसल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यांना लसीकरणाचे कॅम्प शाळेत किंवा व्यायामशाळेत घ्यावे लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.
शिवाजी बारोटे, नागरिक