तुळशीदास घोगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : अंबड- पाथरी मार्गावर केवळ २०० उमरा असलेले शिंदखेड हे गाव वसलेले आहे. या गावाने शासनाच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविले आहे. अंगणवाडी असो किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी असोत; यात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या मोठी आहे.शिंदखेड या गावची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १४१७ आहे. यात पुरुष ७२१ तर महिला ६९६ इतक्या आहेत. या गावांमध्ये मतदारांची संख्या १२१८ इतकी आहे. तर महिला मतदार ५८३ तर पुरुष मतदार ६३५ आहेत. मतदार यादीत पुरुषांची संख्या जास्त असून, महिलांची संख्या कमी आहे. मात्र, २००१ नंतर या गावातील नागरिकांनी मुलगा-मुलगी असा भेद केलेला नाही. त्यामुळे गावात मुलींची संख्या वाढली आहे. येथील अंगणवाडीत ७० मुली शिक्षण घेत आहेत. तर ६५ मुले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १७२ विद्यार्थी आहेत. यात १०६ मुली तर ६६ विद्यार्थी आहेत. या गावातून कुंभारी पिंपळगाव येथे शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या मुलींची संख्या अधिक आहे.घनसावंगी येथील संत रामदास महाविद्यालय, मॉडेल कॉलेज, मत्स्योदरी विद्यालय तर कुंभार पिंपळगाव येथील सरस्वती भुवन विद्यालय, मत्स्योदरी कन्या विद्यालय, शरदचंद्र पवार विद्यालय, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येथील विद्यार्थी जातात. बाहेरगावी १३० विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षण घेतात. यात ८० मुली तर ६० मुले आहेत. एकूणच अंगणवाडी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या ६० टक्के असून, मुलांची संख्या ४० टक्के आहे. मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, यासाठी पालकांचाही पुढाकार आहे.शिंदखेड ग्रामस्थांनी शासनाच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविले आहे. त्यामुळे आजही वंशाचा दिवा म्हणून मुलगाच व्हावा, असा आग्रह धरणा-या कुटुंबांसाठी, गावांसाठी या गावातील नागरिकांनी मुलींना दिलेले महत्त्व प्रेरणादायी असेच आहे.
‘बेटी बचाव’साठी सरसावले शिंदखेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:43 AM