यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही ही शक्यता लक्षात घेऊन माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी या अभियानात हिरिरीने सहभाग घेतला. तसेच त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा नामोल्लेख न करता, भाजपवर सडकून टीका केली. हे सर्व पद्धतशीर नियोजन जालन्यातील शिवसेनेचे चाणक्य जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले होते. जालना लोकसभा मतदारसंघात ज्या भागात रावसाहेब दानवेंचे वर्चस्व आहे, त्या भागात त्यांनी अधिकच्या सभा आणि संपर्क अभियान राबविले. यावेळी माजी आमदार शिवाजी चोथे, तसेच ज्येष्ठ नेते हिकमत उढाण, भानुदास घुगे सांबरे, माजी सभापती मनीष श्रीवास्तव, रमेश गव्हाड यांच्यासह अन्य ज्येष्ठ शिवसैनिकांनी यात सहभाग घेतला. शिवसेनेचे दोन जिल्हा प्रमुख असून, भास्कर अंबेकर यांनी जालना, बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील जवळपास ३६ गावांमध्ये संपर्क साधला. दुसरे जिल्हाप्रमुख ए,जे. बोराडे यांनीदेखील मंठा, परतूर तसेच अंबड आणि घनसावंगीत २८ गावांमध्ये संपर्क साधल्याचे सांगितले.
भाजपला शह देण्यासाठी मुसंडी
जालना लोकसभा मतदारसंघात माजी मंत्री अर्जुन खोतकर आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याने त्यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला तर दुसरीकडे भास्कर अंबेकर यांनी राजकीय वक्तव्य न करता, संघटनेचे महत्त्व आणि ती वाढविण्यासाठी पक्षप्रमुखांचे नियोजन याबद्दल सविस्तर माहिती दिली. दुसरीकडे बोराडे यांनी आमदार लोणीकर यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारून शिवसेनेत नवीन चैतन्य आणले.